मुंबई : फेसबुकवर सतत पोस्ट अपडेट करणं आणि इतरांच्या पोस्ट लाईक करणं या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय. कॅलिफोर्निया विद्यापीठानं यासंबंधी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या अभ्यासासाठी सरासरी 48 वर्षांच्या 5200 लोकांचा अभ्यास करण्यात आला.

कॅलिफोर्निया विद्यापीठानं केलेल्या या संशोधनात सहभागींनी त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचं मापन 1 ते 4 मध्ये नोंदवलं. तर लाईफ सॅटिस्फॅक्शन 1 ते 10 मध्ये नोंदवलं. तसंच बॉडी मास इंडेक्सचीही माहिती दिली. या संशोधनात सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांचा फेसबुकचा डेटा वापरण्याची परवानगीही संशोधकांना दिली होती.

यामुळे संशोधनात सहभागी असलेल्या लोकांच्या फेसबुकवर स्टेटस अपडेट करण्याच्या सवयी आणि इतरांच्या पोस्ट लाईक करण्याची सवय याचा शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करता आला. या संशोधनात सतत फेसबुकवर स्टेटस अपडेट करणं आणि इतरांच्य़ा पोस्ट लाईक करणं यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो असा निष्कर्ष काढण्यात आला.