Travel : पावसाळ्यात सर्व कसं हिरवंगार आणि मन:शांती देणारं दृश्य असतं. अशात वाटेत कुठेतरी धबधबा हा दिसतोच.. या खळखळणाऱ्या धबधब्याकडे पाहून जणू हा धबधबा तुमच्याशी गुजगोष्टी करतोय, असंच वाटू लागतं. मग आपणही आपल्या मनातले रंग उधळून निसर्गाशी एकरूप व्हावं.. अन् याचा मनमुराद आनंद घ्यावा.. या स्पर्धात्मक युगात करिअरसाठी, आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी माणूस सारखा धावतोय. पण थोडं थांबून, सारी बंधनं लांघून एकदा तरी मनमोकळेपणाने जगता आलं पाहिजे, तसं पाहायला गेलं तर पावसाळा ऋतूत कोणताही धबधबा पाहताना डोळ्यांना एक सुखद गारवा मिळतो. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका अशा धबधब्याबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्याल..


महाराष्ट्रातील हा अतिशय प्रसिद्ध धबधबा!


महाराष्ट्र राज्य निसर्गसौंदर्यांनी परिपूर्ण आहे. इथल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्यासाठी लोक दुरून येतात, आज आम्ही ज्या धबधब्याबद्दल सांगत आहोत, तो म्हणजे आंबोली धबधबा.. हा धबधबा आंबोली गावात असून हे हिल स्टेशन दक्षिण महाराष्ट्रात आहे. 690 मीटर उंचीवर वसलेल्या या गावात हा अतिशय प्रसिद्ध धबधबा आहे. अनेक लोक पावसाळ्यात या ठिकाणी पोहोचतात आणि धबधब्याचे सुंदर दृश्य पाहण्याचा आनंद घेतात. येथे जाण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.


 




आंबोली धबधब्यावर करा एन्जॉय पण सांभाळून..


आंबोली धबधब्यापर्यंत जाण्यासाठी काँक्रीटच्या काही पायऱ्या चढून जावे लागते. 
इथे जाऊन तुम्ही आरामात बसू शकता. 
तुम्ही काही काळ विश्रांती घेऊ शकता आणि विलोभनीय दृश्यांचा आनंद घेऊ शकता. 
तुमची इच्छा असेल तर तुम्ही आंबोली धबधब्याच्या स्वच्छ पाण्यात उतरू शकता. 
हा खूप छोटा धबधबा आहे, त्यामुळे इथे खूप लवकर गर्दी होते, 
पण तरीही इथल्या आनंदाला काही कमी नाही..




साबुदाणा वडा, कांदा भजी, भाजलेले कणीस खात धबधब्याचा आनंद घ्या


आंबोली धबधब्याजवळ काही स्थानिक विक्रेत्यांचे स्टॉल आहेत जे स्थानिक खाद्यपदार्थ विकतात. धबधब्याचे सौंदर्य पाहताना तुम्ही साबुदाणा वडा, कांदा भजी आणि भाजलेले कणीस यांचा आस्वाद घेऊ शकता. इथे टपरीवर मिळणारा चहा आणि मॅगी नूडल्सही लोक मोठ्या उत्साहाने खातात.


 


आंबोली धबधब्यावर जाताना अशी काळजी घ्या..


सुट्टीच्या दिवशी धबधब्यांना भेट देणे टाळा, कारण या दिवसांमध्ये आकर्षण विशेषत: गर्दीचे असते.
अत्यंत सावधगिरी बाळगा कारण पावसाळ्यात खडक निसरडे होऊ शकतात.  
चेंजिंग रूमची सुविधा ग्रामपंचायतीद्वारे प्रदान केली जाते आणि प्रति व्यक्ती 10 रुपये खर्च येतो.
 


आंबोली धबधब्याला भेट देण्याची उत्तम वेळ कोणती? 


पावसाळ्यात आंबोली धबधब्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. कारण यावेळी धबधब्यात भरपूर पाणी वाहत असते. अशात तुम्ही ऑगस्ट महिन्यातही या ठिकाणी जाऊ शकता. 




आंबोली धबधब्याला कसं पोहचाल?


मुख्य बसस्थानकापासून आंबोली धबधबा फक्त तीन किलोमीटरवर आहे. 
येथील स्थानिक वाहतुकीचे एकमेव साधन म्हणजे ऑटो आणि खाजगी टॅक्सी, 
त्यामुळे तुम्ही धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही पर्याय निवडू शकता. 
रस्त्याच्या एका बाजूला पार्किंगची सोय आहे, 
त्यामुळे तुम्हाला तुमच्या वैयक्तिक वाहनाची आणि पार्किंगच्या त्रासाची काळजी करण्याची गरज नाही.


 


हेही वाचा>>>


Hidden Gem Travel : हिरव्यागार जंगलात लपलेला महाराष्ट्रातील आणखी एक धबधबा..निसर्गाची एक चित्तथरारक देणगी! जी तुम्हाला वेड लावेल


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )