Relationship Tips: घर म्हटलं की, भांडण आलंच आणि भांडणामुळेच प्रेम वाढतं, असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो. कोणतंही नातं असो, भांडणं (Dispute) आलीच. मग गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो वा, नवरा-बायको. बऱ्याचदा जर एखाद्या जोडप्यात भांडण होत नसेल, तर हा विशेष चर्चेचा मुद्दा असतो. मजेची बाब सोडली तर अनेकदा घरातली लहान-सहान भांडणं विकोपाला जातात आणि नात्यामध्ये मोठा अडथळा ठरतात. मग येतो नात्यातला दुरावा. त्यामुळे भांडणं जेवढी टाळाल तेवढं नातं आणखी खुलेल, असा सल्लाही दिला जातो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, एखाद्या नात्यामध्ये भांडण झालं तर त्या भांडणादरम्यान बोललेले अपशब्द नातं तुटण्याचं किंवा नात्यामध्ये दुरावा येण्यासाठी कारण ठरतात. थोरामोठ्यांकडून नात्याबाबत बोलताना नेहमीच विश्वासाचा आधार दिला जातो. नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणं आणि खरं बोलणं गरजेचं असतं, असंही सांगितलं जातं. पण अनेकदा लहान वाद मोठ्या भांडणात आणि मारझोडीच रुपांतरीत होतात.
एकमेकांना डिवचण्यापासून सुरू झालेलं भांडण अगदी शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत जातं. त्यामुळे वेळीच स्वतःला आवरुन भांडण पुढे जाण्यापूर्वीच संपवणं फायदेशीर ठरतं. नात्यातलं प्रेम वाढवण्यासाठी एकमेकांना समजून घेणं, त्यांचा आदर करणं, आपुलकीनं बोलणं या गोष्टींवर लक्षं देणं गरजेचं आहे. तुमचीही तुमच्या जोडीदारासोबत सारखी भांडणं होत असतील, तर काही छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही भांडणं मिटवू शकता.
एकमेकांची समजूत काढा
जोडीदारासोबत भांडण झालं, तर सर्वात आधी शांत राहा. जोडीदाराची एखादी गोष्ट खटकली असेल तर, त्यावर लगेच रिअॅक्ट करु नका. थांबा थोडा वेळ जाऊ द्या. जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुमची छोटीशीही चूक भांडण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
कितीही राग आला तरी स्वतःवर नियंत्रण ठेवा
नातं म्हटलं तर भांडण आलंच. पण तुमचं भांडण झाल्यावर तुम्हाला कितीही राग येऊ देत, सर्वात आधी स्वतःवर नियंत्रण ठेवा. शांत राहा, जोडीदाराला समजून घ्या, भांडण झाल्यावर एकमेकांचा राग येणं स्वाभाविक आहे, पण त्यावेळी रागाच्या भरात कोणताही अपशब्द उच्चारू नका. तुमचा एक शब्द भांडण मिटवण्याऐवजी भांडण वाढवू शकतं.
दोघांच्या भांडणात तिसऱ्याची एन्ट्री नकोच
तुमचं तुमच्या जोडीदारासोबत भांडण झालं असेल तर, समजून घ्या. तुम्हा दोघांच्या भांडणात तिसऱ्या कोणाचीच एन्ट्री नको. मग ते कोणीही असो, कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र-मैत्रिणी, कोणीच नको. तुमच्या दोघांमधलं भांडण, तुमच्यामध्येच मिटवण्याचा प्रयत्न करा.
भांडण सुरू होण्यापूर्वीच पूर्णविराम द्या
भांडण विकोपाला जाण्यापूर्वीच पूर्णविराम द्या. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा शांत राहा. काही गोष्टी मनाला लावून घेण्यापेक्षा इग्नोर करायला शिका. भांडणामध्ये शब्दानं शब्द वाढतो. त्यामुळे आधीच काळजी घ्या, वाद वाढण्यापूर्वीच थांबवा.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Food While Sitting on Floor : आई सारखी सांगते खाली बसून मांडी घालून जेव; पण का? काय फायदे होतात?