मुंबई : कोरोना, लॉकडाऊमुळे नागरिक हतबल झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशातील नागरिकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या भीतीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असून अनेक लोक नैराश्याच्या आहारी जाऊ लागले आहेत.


लॉकडाऊननंतर लोक घरीच राहिल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. वर्क फ्रॉम होम असल्याने घरात बसून काम असल्याने शारीरिक हालचाल मंदावली आहे. याचा नकळत परिणाम शरीरावर होत आहे. त्यात अनेकांच्या हाताला काम नाही, आर्थिक संकट, जीवनशैलीत बदल आणि मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.


 फिजीकल अॅक्टिव्हीटी आणि मानसिक आरोग्यावर यांचा कोरोना काळात परस्पर कसा संबंध आहे याचा अभ्यास अमेरिकेतील पाच राज्यात करण्यात आहे. या अभ्यासानुसार  कोरोना काळात लोकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.  शाररिक हालचाल ही मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. पण कोरोनामुळे अनेक लोकांचे हे चक्र पूर्णपणे बिघडल्याचे प्राध्यपिका लिंडझी यांनी सांगितले आहे. 


प्रा. लिंडझी पुढे म्हणतात, कोरोना महामारीमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे लोकांमध्ये स्थूलता वाढली आहे. लोकांच्या शारीरिक हालचाली देखील मंदावल्या आहे याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होत आहे.  बेरोजगारी, भविष्याची काळजी, व्यवसायाचे नुकसान यामुळे लोकांमध्ये नैराश्य, ताण तणाव वाढले आहे. गृहिणींच्या मानसिकतेवरही याचा गंभीर परिणाम जाणवत आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे.


हा अभ्यास करण्याकरता संशोधकांनी दोन प्रश्नांवर जास्त लक्ष दिले. पहिला प्रश्न होता की, कोरोना मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम झाला? आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य परस्परांवर अवलंबून आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी एक ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला. या ऑनलाईन सर्व्हेमध्ये पाच राज्यातील 4,026 लोकांचा समावेश करण्यात आला. हा सर्वे एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत घेण्यात आला आहे. या संशोधनात फिजीकली अॅक्टिव्ह असलेल्या लोकांचे मानसिक आरोग्य उत्तम होते. तसेच शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना महामारीच्या अगोदर असलेल्या फिजीकल अॅक्टिव्हीटी स्थिर ठेवण्यास अनेक समस्या आल्या. तर ग्रामीण भागातील नागरिकांना जास्त समस्या आल्या नाहीत.