Shravan Travel : हिंदू धर्मात श्रावण महिना खूप खास आहे, त्याचप्रमाणे श्रावणातील श्रावणी सोमवार हे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.  श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार आणि धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी श्रावण महिन्यात खऱ्या मनाने ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसं पाहायला गेलं तर भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. इतर ज्योतिर्लिंगांप्रमाणेच महाराष्ट्रातील एक असे चमत्कारी ज्योतिर्लिंग आहे, जे शिवभक्तांसाठी अतिशय विशेष आणि पवित्र आहे. अशी भाविकांची धारण आहे. जाणून घ्या या ज्योतिर्लिंगाबद्दल...



घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोठे आहे?


आज आम्ही तुम्हाला ज्या ज्योतिर्लिंगाविषयी सांगणार आहोत, जेथे तुम्ही श्रावण महिन्यातही दर्शनासाठी पोहोचू शकता. ते ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास आणि पौराणिक कथा जाणून घेण्याआधी हे मंदिर नेमके कोठे आहे? तर हे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे आहे, वेरूळ येथून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे. हे पवित्र मंदिर अजिंठा आणि एलोराच्या लेण्यांपासून सुमारे 2 किमी अंतरावर आहे.


 


 




घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास, फार कमी लोकांना माहित


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास खूप रंजक आहे. या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, हे मंदिर कधी बांधले गेले याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. मान्यतेनुसार, वेरूळ गावातील येळगांगा नदीजवळ हे प्राचीन मंदिर असून मंदिराचं बांधकाम लालरांगाच्या दगडाने करण्यात आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजी राजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी १६व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा शेवटचा जीर्णोद्धार 18 व्या शतकात देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते. 


 


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा खूप मनोरंजक आहे. देवगिरी पर्वताजवळ सुधर्मा नावाचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुदेहा राहत होते, परंतु त्यांना मूलबाळ नव्हते. मूलबाळ न झाल्यामुळे सुदेहाने तिची धाकटी बहीण घुष्माचे लग्न ब्राह्मणाशी लावून दिले. घुष्मा ही भगवान शिवाची महान भक्त होती. ती 100 पार्थिव शिवलिंगे बनवायची आणि दररोज त्यांची पूजा करायची आणि तलावात विसर्जित करायची. शिवभक्तीच्या कृपेने घुष्माला पुत्रप्राप्ती झाली, पण सुधर्माला हे बघवले नाही आणि त्याने मुलाला मारून त्याच तलावात फेकून दिले. मुलाच्या मृत्यूनंतरही घुष्मा भक्तीत तल्लीन राहिली गेली आणि एके दिवशी त्याच तलावात तिचे मूल जिवंत सापडले. घुष्माची भक्ती पाहून भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि आज ज्या ठिकाणी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना आहे. भगवान भोलेनाथही त्याच ठिकाणी प्रकट झाले असे म्हणतात.


 


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने भाविकांची इच्छा पूर्ण होते?


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी असे मानले जाते की ते शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. पौराणिक मान्यतेनुसार, येथे जो खऱ्या मनाने दर्शनासाठी येतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त येथे भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यात दररोज हजारो भाविक येथे येतात. विशेषत: श्रावणाच्या सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जल अर्पण करण्यासाठी येतात.




 


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला कसे पोहचाल?


घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचणे अगदी सोपे आहे. येथे पोहचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन औरंगाबाद आहे. 
तुम्ही रेल्वे स्टेशनवरून टॅक्सी किंवा कॅबने सहज घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग गाठू शकता.
जर तुम्हाला हवाई प्रवासाने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग गाठायचे असेल तर तुम्ही छ.संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळावर पोहोचू शकता. 
औरंगाबाद विमानतळावरून स्थानिक टॅक्सी किंवा कॅबने तुम्ही वेरुळ येथे असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचू शकता.


 


 


 


हेही वाचा>>>


Travel : आश्चर्यच..! ज्या शिवलिंगांचा 3 वेळा बदलतो रंग, 900 वर्षांहून अधिक जुनं भारतातील एक रहस्यमय शिवमंदिर, सर्वकाही जाणून घ्या


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )