Shardiya Navratri 2023 : भारतीय संस्कृतीत उपवासाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. आजपासून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गादेवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रीत अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. या उपवासात खाण्यापिण्याच्या सवयींवर कडक नियंत्रण ठेवले जाते. कमी खाल्ल्याने आणि उपवास केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. पण उपवासामुळे कमी खाल्ल्यानेही जास्त भूक लागते. अशा परिस्थितीत भूकेवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. चला अशा काही टिप्स जाणून घेऊयात जेणेकरुन तुमचा उपवास चांगल्या प्रकारे पूर्ण होईल आणि तुम्ही तुमची भूक देखील नियंत्रित राहील. 


भरपूर पाणी प्या :


उपवासात भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे भूक कमी होते. हे शरीराला हायड्रेट ठेवते पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासही मदत होते. लिंबू पाणी प्यायल्याने भूकही नियंत्रित राहते. त्यामुळे उपवासाच्या काळात भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. 


फायबरयुक्त फळे खा : 


उपवासाच्या वेळी भूक नियंत्रित ठेवण्यासाठी फायबरयुक्त फळं खाणं फायदेशीर ठरते. फळांमध्ये आढळणारे फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. फळांचे सेवन केल्याने पोट भरलेले वाटते आणि भूक नियंत्रित राहते. फळे शरीराला हायड्रेट ठेवतात. याशिवाय फळांमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे उपवासात फायबरयुक्त फळांचे सेवन करावे.


प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका


उपवासाच्या वेळी बाजारात उपलब्ध असलेले प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळावे. जास्त साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक चढ-उतार होऊ शकतात, ज्यामुळे भूक वाढू शकते आणि जास्त खाण्याचा धोका वाढू शकतो. 


जास्त वेळ उपाशी राहू नका 


जास्त वेळ उपाशी राहिल्याने शरीरात अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय जास्त वेळ उपाशी राहिल्यास अन्न खाल्ल्यानंतरही भूक भागत नाही. त्यामुळे उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जेची कमतरता भासू नये म्हणून आपण ठराविक अंतराने काही ना काही कमी प्रमाणात खात राहिले पाहिजे.


चांगली झोप घ्या :


उपवासात चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यास जास्त भूक लागते. जर तुम्ही रात्री योग्य वेळी झोप घेतली तर तुम्हाला भूक लागणार नाही. तसेच, दुपारच्या वेळी थोडी झोप घेतल्यानेही भूक नियंत्रणात राहते. झोप शरीराला विश्रांती देते आणि भूक कमी करते.