नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे 30 डिसेंबरपर्यंत जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटांमध्ये 14.5 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण 15.44 कोटी लाख रुपयांपैकी 94 टक्के जुन्या नोटा आता आरबीआयकडे जमा झाल्याचं 'बिजनेस स्टँडर्ड'ने म्हटलं आहे.
आरबीआयकडे आतापर्यंत किती जुन्या नोटा जमा झाल्या याची पुन्हा एकदा मोजणी करुन अंतिम आकडा लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. एकूण जुन्या चलनाच्या 94 टक्के नोटा 50 दिवसांमध्ये नागरिकांनी जमा केल्या आहेत. 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा 15.44 कोटी लाख रुपये किंमतीच्या जुन्या नोटा चलनात होत्या.
अंतिम आकडा मोठा असण्याची शक्यता आहे. कारण 8 नोव्हेंबरपासून 50 दिवस परदेशात असणारे नागरिक 30 मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा करु शकणार आहेत. तर अनिवासी भारतीय 30 जूनपर्यंत जुन्या नोटा जमा करु शकतील. शिवाय काही ठिकाणी नोटांचं डबल काऊंटिंग झालं असण्याची शक्यता अर्थमंत्रालयाने वर्तवली आहे, ज्याची पडताळणी आरबीआयकडून सुरु आहे.