Tulsi Vivah 2023 : कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवोत्थान, देवउठनी किंवा प्रबोधिनी एकादशी म्हणतात. दिवाळीनंतर ही एकादशी येते. मान्यतेनुसार देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 5 महिने निद्रावस्थेतून जागे होतात. या एकादशीला भगवान हरीचा जागर झाल्यानंतर शुभ कार्याला सुरुवात होते. या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजनही केले जाते. यावेळी 24 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह होणार आहे.
....म्हणूनच 'या' दिवशी तुळशी विवाह करतात
शास्त्रामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपात तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीविवाह केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. असे मानले जाते की जो कोणी तुळशी विवाहाचे आयोजन करतो त्याला अत्यंत शुभ फल प्राप्त होते. तुळशीविवाह पूर्ण विधीपूर्वक केला जातो. भगवान शाळीग्राम हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. असे मानले जाते की देउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह माता तुळशीशी झाला. म्हणूनच या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले पाहिजे.
'अशा' लोकांनी आयुष्यात एकदा तरी तुळशीचा विवाह करावा
तुळशी विवाहात तुळशीचे झाड आणि शाळीग्राम यांचा विवाह सामान्य विवाहाप्रमाणेच थाटामाटात केला जातो. या दिवशी तुळशीद्वारे देवाला आवाहन केले जाते. ज्या जोडप्यांना मुली होत नाहीत, त्यांनी आयुष्यात एकदा तरी तुळशीचा विवाह करावा असे शास्त्रात सांगितले आहे. याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. तुळशीशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाते.
या पद्धतीने तुळशीविवाह करा
तुळशी विवाहासाठी सर्वप्रथम तुळशीचे रोप तुमच्या घरातील अंगण, गच्ची किंवा पूजा घराच्या मध्यभागी एका फळीवर ठेवावे. तुळशीच्या कुंडीवर उसाचा मंडप सजवा. तुळशीदेवीला सर्व श्रृंगाराने सजवा, लाल वस्त्र अर्पण करा. आता शालिग्रामजींनी एका दुसऱ्या कुंडीत ठेवा. त्यावर तीळ अर्पण करावे. दुधात भिजवलेली हळद तुळशीला आणि शाळीग्रामला लावावी. उसाच्या मंडपावर हळद लावून पूजा करावी. हिंदू धर्मानुसार विवाह लावताना मंगलाष्टक वाचा. कापूर लावून तुळशी मातेची आरती करून प्रसाद द्यावा. तुळशीच्या भोवती 11 वेळा प्रदक्षिणा घाला. यानंतर मुख्य अन्नासोबत प्रसादाचे सेवन करावे. प्रसाद वाटप करा. पूजेच्या शेवटी, घरातील सर्व सदस्यांनी सर्व बाजूंनी ताट उचलून भगवान विष्णूला जागे होण्याचे आवाहन करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Ekadashi 2023: 'या' दिवसापासून लग्नसराईला सुरूवात! देवउठनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तारीख, मुहूर्त