Pitru Paksha 2023 : 29 सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृ पक्ष 14 ऑक्टोबरला संपणार आहे. या दरम्यान पूर्वजांचे भक्तीभावाने स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृपक्षातील पितरांच्या तिथीला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. पितृपक्षात पितरांचे पूर्ण विधीपूर्वक श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यानंतर ते त्यांच्या वंशजांना सुख-समृद्धी देतात. असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात.
पूर्वज 'या' स्वरूपात पृथ्वीवर येतात
धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षात कावळ्याला विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की, या दिवसांमध्ये पूर्वज कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात, पाणी आणि अन्न घेतात. कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की, श्राद्ध करण्यासाठी आपले पूर्वज ठरलेल्या तिथीला दुपारी कावळ्याच्या रूपात आपल्या घरी येतात. पितृ पक्षात जर कावळा तुमच्या घरी आला आणि अन्न खात असेल तर याचा अर्थ तुमच्या पूर्वजांनी तुमच्यावर कृपा केली आहे. यामुळेच श्राद्धाचा पहिला भाग कावळ्यांना दिला जातो.
घरात लाल मुंग्या दिसल्या तर...
धार्मिक मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात घरात लाल मुंग्या दिसल्या तर घरात पितरांचा वावर असल्याचेही लक्षण आहे. असे मानले जाते की आपले पूर्वज मुंग्यांच्या रूपात आपल्या वंशजांना भेटायला येतात. अशा स्थितीत मुंग्यांना पीठ खायला द्यावे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.
पूर्वजांना अन्न कसे मिळते?
हिंदू धर्मात मृत्यूनंतर पुनर्जन्म अशी मान्यता आहे. मृत्यूनंतर, आत्मा पितृलोक, गंधर्व लोक किंवा इतर कोणत्याही लोकात जाऊ शकतो. हे आत्म्याच्या स्वतःच्या कर्मांवर अवलंबून असते. आत्म्याचे लोक किंवा योनी हे त्याच्या पुण्य आणि पापांवरून ठरवले जाते, धार्मिक मान्यतेनुसार पूर्वजांचा आत्मा कुठेही असो, तुम्ही केलेल्या श्राद्धाचे अन्न त्याला समाधान देईल.
...तर पूर्वजांना अन्न अमृत स्वरूपात मिळेल
जर पूर्वज देवयोनीत पोहोचले तर त्यांना हे अन्न अमृत स्वरूपात मिळेल, जर ते गंधर्व लोकात गेले तर त्यांना नैवेद्य रूपात मिळेल, जर ते पशुयोनीमध्ये असतील तर ते गवताच्या रूपात मिळेल. सर्पयोनीत असतील तर ते वायूच्या रूपात तृप्त होतील. यक्षयोनीच्या पितरांना श्राद्धाचे फळ पेय स्वरूपात, दानवयोनीच्या पितरांना मांसाच्या रूपात, प्रेतयोनीच्या पितरांना रक्ताच्या रूपात आणि जे पितर मनुष्ययोनीत गेले त्यांना अन्नरुपात श्राद्धाचे फळ मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या