Navratri 8th Day 2023 : आज 22 ऑक्टोबर 2023, आज दुर्गाष्टमी आहे, देवी महागौरी (Devi Mahagauri) ही शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवसाची अधिष्ठात्री देवी आहे. 15 ऑक्टोबरपासून 9 दिवसांच्या नवरात्रीला सुरुवात झाली असून आज अष्टमीला महागौरी देवीची पूजा केली जाणार आहे. धार्मिक ग्रंथ आणि शास्त्र काय सांगतात? देवी महागौरीची कथा आणि पूजेचे महत्त्व जाणून घ्या



देवीला महागौरी नाव कसे पडले?



धार्मिक मान्यतेनुसार नारदांच्या सांगण्यावरून देवी पार्वतीने महादेवाशी विवाह करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी तिने कठोर तपश्चर्याही केली. या कठोर तपश्चर्येमुळे त्यांचा रंग काळा झाला. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेले महादेव जेव्हा तिला वरदान देण्यासाठी आले तेव्हा त्यांनी पार्वतीच्या अंगावर गंगाजल शिंपडले, यामुळे तिच्या शरीरातील काळेपणा दूर झाला. तुलसीदासजींनी त्यांच्या ग्रंथात पार्वतीच्या तपश्चर्येचा उल्लेख केला आहे. तिच्या गोऱ्या रंगाची तुलना शंख आणि चंद्राशी केली जाते. नवदुर्गा ग्रंथानुसार देवीला तिच्या 'गौर'  म्हणजेच गोऱ्या वर्णामुळे महागौरी असे नाव पडले आहे. 



नवरात्रीचा आठवा दिवस : देवीचे रुप कसे आहे?



देवीचे रुप किशोरवयातील असून तिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहेत. त्यांना चार भूजा आहेत. उजव्या बाजूला, वरचा हात अभय मुद्रामध्ये आहे आणि खालच्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात अभय मुद्रा आहे. तिचे वाहन वृषभ आहे. अशा या मनमोहक रुपाची भाविक भक्तीभावाने पूजा करतात. या देवी महागौरीची पूजा केल्याने इच्छित फळ मिळते असेही म्हणतात.


महागौरीचा प्रार्थना मंत्र आहे:-


श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः ।।महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।। 



महागौरीची उपासना खूप फलदायी



महागौरीची उपासना खूप फलदायी आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो, अशी मान्यता आहे. अनेक जन्मांची पापंही नष्ट होतात. मनापासून केलेली उपासना देवीकडून उत्तम फळ मिळते. त्यांच्या शरणागतीने आपल्यासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात. असे धर्मग्रंथात म्हटले आहे.



नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्याभोजन किंवा अन्नदान करा



देवी पुराणानुसार या दिवशी कन्याभोजन किंवा अन्नदान करावे. महिला आज जांभळ्या रंगाचे कपडे घालतात. बरेच लोक या दिवशी हवन आणि कन्या पूजा देखील करतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Durgashtami 2023: दुर्गाष्टमीला दोन शुभ योगांचा संयोग, देवीच्या आशीर्वादाने तुमचे नशीब चमकेल! जाणून घ्या