Guru Nanak Jayanti 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरू नानक यांची जयंती साजरी केली जाते. आजचा दिवस शिख समुदायाकडून गुरू पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. यंदा गुरू नानक यांची 554 वी जयंती साजरी केली जात आहे.  या वर्षी 2023 मध्ये, गुरु नानक जयंती सोमवार, म्हणजेच आज 27 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी करण्यात येत आहे. गुरु नानक जयंतीच्या दिवसाला प्रकाश पर्व असेही म्हणतात. या दिवशी शीख समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये जातात, सेवा करतात आणि लंगरच्या स्वरूपात गुरूंच्या नावाने प्रसाद खातात. (Guru Nanak Jayanti 2023)


कधीही संसारिक गोष्टींचा मोह ठेवला नाही


गुरू नानक यांचा जन्म 1469 साली पंजाब प्रांतातील तलवंडी या ठिकाणी झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे. नानक लहानपणापासूनच आपला वेळ चिंतनात घालवत असत. त्यांनी कधीही संसारिक गोष्टींचा मोह ठेवला नाही. नानकांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता. पंजाबी, फारशी आणि अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं. वयाच्या 11 व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात असताना त्यांनी पुराणमतवादाविरोधात संघर्ष सुरू केला.  गुरू नानक यांनी देशभर प्रवास केला. सन 1521 पर्यंत त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांतील प्रमुख स्थांनांना भेटी दिल्या. गुरू नानक हे सर्वेश्वरवादी होते. त्यांनी त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनाने सर्व धर्मातील चांगुलपणा आत्मसात केला. देव एक आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत अशी त्यांची शिकवण होती. देवाच्या समोर सर्व लोक समान आहेत असं ते म्हणायचे. गुरू नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ 'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.


गुरु नानक जयंतीशी संबंधित खास गोष्टी


गुरू नानक यांनी आपलं संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी समर्पित केलं. प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता, बंधुता आणि परोपकार या गोष्टी त्यांनी शिकवणीतून दिल्या. याच मूल्यांवर आधारित त्यांनी शिख धर्माची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला. गुरु नानक यांनी इक ओंकारचा नारा दिला. म्हणजे देव एकच आहे. एक ओंकार हे शीख धर्माच्या मूलभूत तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे, ज्याचा अर्थ 'एकच सर्वोच्च शक्ती आहे'. गुरु नानक देवजींनी शीख समाजाचा पाया घातला होता. म्हणूनच त्यांना शिखांचे पहिले गुरु म्हटले जाते. गुरु नानक देवजींचे खरे नाव 'नानक' होते. त्यांचे टोपणनाव बाबा नानक होते. नानक देवजींचे भक्त त्यांना नानक, बाबा नानक, नानक देव जी असे संबोधत असत. गुरू नानक यांनी त्यांचे शिष्य आणि भाऊ लहाना यांना आपला उत्तराधिकारी निवडलं. नंतर त्यांनाच गुरू अंगद देव म्हणून ओळखलं गेलं. गुरू नानक साहेब यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी निधन झालं. सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कर्तारपूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले. हे ठिकाण शिख समुदायासाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखलं जातं. 


गुरु नानक देव जी यांचे मौल्यवान विचार जाणून घ्या.


गुरु नानक देव ज्यांनी एक ओंकारचा नारा दिला आणि सांगितले की सर्वांचा पिता परमेश्वर एकच आहे, म्हणून प्रत्येकाने सर्वांवर प्रेम केले पाहिजे.
लोकांनी प्रेम, एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला पाहिजे.
आपण कधीही दुसऱ्याचा हक्क हिरावून घेऊ नये. आपण कठोर परिश्रम करत प्रामाणिकपणे गरीब आणि गरजूंना मदत केली पाहिजे.
माणसाने नेहमी लोभ सोडून कठोर परिश्रम केले पाहिजे आणि योग्य मार्गाने संपत्ती मिळवली पाहिजे.
गुरू नानक देव नेहमी स्त्री-पुरुष समान मानत, त्यांच्या मते स्त्रियांचा कधीही अनादर करू नये.
जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता, तेव्हा देव तुम्हाला मदत करतो. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे रहा.
मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करून त्यातूनही गरजूंना काहीतरी द्यायला हवे.
कर्माच्या भूमीवर फळ मिळविण्यासाठी प्रत्येकाला काम करावे लागते. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)