Ashadhi wari 2023 :   महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला (Ashadhi wari 2023)  ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार आहे. देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.  यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. 


पालखी प्रस्थान सोहळ्यात होणारे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे


पहाटे 5 वाजता – श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा
पहाटे 5:30 वाजता – तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा
सकाळी 9 ते 11वाजता – श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन, इनामदार वाडा.
सकाळी 10 ते 12वाजता – पालखी प्रस्थान सोहळा काला कीर्तन
दुपारी 2 वाजता – पालखी प्रस्थान सोहळा , अश्व व दिंड्यांचे देउळवाड्यात आगमन
सायंकाळी 5 वाजता – पालखी प्रदक्षिणा
सायंकाळी 6:30 वाजता – पालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती.
रात्री 9 वाजता कीर्तन, जागर


कुठे असेल पालखीचा मुक्काम?


जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13  जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार 14 जून लोणीकाळभोर, गुरूवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार 18 जून  बारामती, सोमवार 19 जून सणसर, मंगळवार 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण आणि मुक्काम, बुधवार 21 जून निमगाव केतकी, गुरूवार 22 जून इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण आणि मुक्काम, शुक्रवार 23 जून सराटी, शनिवार 24 जून रोजी सकाळी निरा स्नान व दुपारी तिसरे गोल रिंगण आणि (Dehu) रात्रीचा मुक्काम अकलुज येथे होईल. रविवार 25 जून रोजी सकाळी माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम होईल. सोमवार 26  जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पिराची कुरोली येथे होईल. मंगळवार 27 जून रोजी बाजीराव विहिर येथे उभे रिंगण आणि रात्री वाखरी येथे मुक्काम होईल.