Ashadhi Wari 2023: शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) पालखी सोहळा आज (10 जून) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी व छोट्या दिंड्याचे शुक्रवारपासून शहरात आगमन सुरू झाले. वारीत जाण्यासाठी वारकऱ्यांची महिनाभरापासून तयारी सुरू आहे. त्यामुळे यंदा वारीतील वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालखी सोहळ्याचे यंदा 425 वे वर्ष असून पालखी सोहळ्याच्या रथाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पालखी ओटा व परिसराचा विकास झाल्यानंतर प्रथमच येथून पालखी प्रस्थान करणार आहे. यामुळे यंदाचा वारकऱ्यांचा अनुभव वेगळा राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद व सोलापूर अशा 5 जिल्ह्यातून पालखी मार्गक्रमण करणार आहे. पंढरपूरपर्यंत एकूण 18 मुक्काम करून पायी दिंडी सोहळा 28 जून रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरला पोहोचणार आहे. नाथांच्या वारकऱ्यांच्या जवळपास 90 दिंड्या नाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. 20 हजारपेक्षा जास्त वारकरी महिला व पुरुष 260 किलोमीटरचे अंतर पायी पार करून पंढरपूरला पोहोचतात.
असे होणार पाच रिंगण सोहळे
पैठण ते पंढरपूर पालखी मार्गावर पाच 'रिंगण सोहळे' होणार आहेत. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडणार आहे. पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे तर 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होईल. तर चौथे रिंगण 23 जूनला कव्हेदंड व पाचवे रिंगण 28 रोजी पंढरपूर येथे होणार आहे. 27 जून रोजी होळे येथील भीमा नदी पात्रात नाथांच्या पादुकांचा स्नान सोहळा होणार आहे. तसेच 29 जून रोजी पंढरपूर शहरात नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे. 2 जुलै रोजी मंदिरात परंपरागत पद्धतीने भानुदास महाराज पुण्यतिथी साजरी करून पालखी सोहळा परतीच्या प्रवासास रवाना होणार असल्याचे पालखी प्रमुख रघुनाथबुआ गोसावी यांनी सांगितले.
सकाळपासून जोरदार तयारी सुरु...
पैठण येथिल शांतब्रम्ह संत एकनाथ महाराज यांची पालखीचे आज प्रस्थान होणार आहे. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेस पैठण येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तब्बल 19 मुक्काम करत नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे.या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सकाळपासून सुरु झाली आहे. पालखी रथाला आकर्षक अशी फुलांची आरस करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: