Ashadhi Wari 2023 : आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari) येणारे भाविक पंढरपूर (Pandharpur) येथून नेहमीच सौभाग्यालंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देत असतो. विशेषतः महिला भाविक यात्रा संपवून जाताना कुंकू, बुक्का, अष्टगंध, चंदन याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांकडून जवळपास 100 टन कुंकू आषाढीच्या काळात लागत असते. अशावेळी वर्षभर बनवूनही तेवढे कुंकू तयार करायची ताकद येथील कारखानदारात नसल्याने राज्यभरातून येथे कुंकवाची आयात होत असते. मात्र कुंकू खरेदी करताना चोखंदळ भाविक हळदीपासून बनवलेल्या म्हणजेच पिंजर कुंकवाला पसंती देत असल्याने हे पहिल्या दर्जाचे कुंकू पंढरपूरमध्येच मोठ्या प्रमाणात बनवले जाते. 


कुंकू बनवण्यासाठी अलिकडच्या काळात स्टार्च, चिंचोका पावडर, मका पावडर यापासून बनवलेले कुंकू दुसऱ्या दर्जाचे मानले जाते. याशिवाय हलक्या दर्जाचे स्वस्तातील कुंकू राज्यभरातून येत असले तरी हळदीच्या आणि स्टार्चपासून बनवलेल्या कुंकवास भाविकांकडून मोठी मागणी असते. यात्रा काळात नुसत्या कुंकवाची उलाढाल 10 ते 15 कोटी रुपयाची होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी हा मोठा सुगीचा काळ असतो. यामुळेच हे कारखानदार जवळपास दीड ते दोन महिन्यापासून आषाढीच्या खास तयारीला लागलेले असतात. तयार केलेले कुंकू वेळेत वाळवून बाजारपेठेत पाठवणे यासाठी मोठ्या जागा लागतात .  


कुंकू, बुक्का कसा तयार करतात?


कुंकू बनवताना पहिल्यांदा ग्राईंडरमध्ये बारीक एकजीव करुन घेऊन मग मिक्सरमध्ये टाकून फिरवले जाते. यावेळी या मिश्रणात ठरलेले मिश्रण केल्यावर लाल रंगांच्या विविध छटात कुंकू तयार होते. त्यानंतर मात्र तयार झालेले कुंकू काही दिवसासाठी कडक उन्हात वाळत  घालावे लागत असल्याने सर्वसाधारणपणे एप्रिल आणि मे मध्ये हे कुंकू तयार करण्यात येते. जितके ऊन चांगले तेवढी कुंकवाची प्रत चांगली बनत असते. तयार केलेले हे कुंकू वाळवण्यासाठी उघड्यावर पसरुन ठेवत त्याला ऊन दिले जाते. कुंकवाप्रमाणेच अष्टगंध, गुलाल आणि बुक्का देखील तयार केल्यावर वाळवण्यासाठी बाहेर ठेवावा लागतो. तयार झालेले कुंकू शहरातील व्यापारी दोन महिने आधीपासून खरेदी करुन त्याच्या पॅकिंगमध्ये गुंतलेले असतात. चांगल्या प्रतीच्या बुक्क्याची निर्मिती तुळशी अथवा इतर लाकडाच्या भुश्यापासून होते तर दुसऱ्या दर्जाचा बुक्का हा कोळशाच्या भुकटीपासून तयार होतो.


परात लावणे म्हणजे काय?


पंढरपूरमध्ये कुंकू विक्री ज्या आकर्षक पद्धतीने केली जाते ती पद्धत इतर ठिकाणी सहसा पाहायला मिळत नाही. येथे जवळपास 800 किलो कुंकवाचा उंच ढीग एक परातीत लावण्यात येतो याला परात लावणे हा शब्द पंढरपूरमध्ये रुढ झाला आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी या उंच कुंकवाच्या पराती लावल्या जातात. कोणत्याही दुकानात गेला तरी अशा पराती लावण्याची पद्धत इथे दिसून येते. ही परात लावण्यासाठी किमान 4 ते 5 तास अतिशय सहनशक्ती ठेवून बारकाईने हे काम केले जाते. या पराती लावून त्यातील कुंकू मागच्या बाजूने काढून भाविकांना विकताना हा उंच ढीग ढासळणार नाही याचीही काळजी घेतली जाते .   


आषाढी वारीत कुंकवाची मोठी बाजारपेठ


प्रत्येक वारकरी पंढरपूरवरुन परतीला निघताना विठुरायाचा हा कुंकू बुक्क्याचा प्रसाद गावाकडे पाहुणे, मित्र आणि शेजाऱ्यांना देऊनच या सग्यासोयरांना वारी पोहोचवत असतात. आपल्या ज्या सग्या सोयऱ्यांना वारीला येणे शक्य झाले नाही त्यांना या प्रसादाच्या रुपाने विठुरायाचे दर्शन व्हावे आणि आपल्या घरातही हा प्रसादरुपी विठुरायाला घेऊन जाणे हाच यामागचा उद्देश असतो. ही प्रथा वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या पाळत आला असल्याने मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग परिसरात शेकडो कुंकू व्यापाऱ्यांची दुकाने आणि यामुळेच आषाढी यात्रेत कुंकवाची बाजारपेठ मोठी मानली जाते. 


हेही वाचा


Ashadhi Wari 2023 : मालिशमुळे वारकरी सुखावले... दिवेघाटात चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एका क्षणात हसू