Ashadhi Wari 2023 : यंदा आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) ही विक्रमी होणार या अंदाजाने शासन, प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र आज (28 जून) आषाढ शुद्ध दशमीला पत्राशेडच्या बाहेर रांग आलेली नाही. त्यामुळे पुढे जवळपास तीन किलोमीटर बनवलेली रांग ओस पडल्याचे चित्र आहे. पावसाने ओढ दिल्यानेच भाविकांनी आषाढी यात्रेकडे (Ashadi Wari) पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. 


दरवर्षी दशमीला दर्शनाची रांग गोपाळपुराच्या पुढे रांजणी रस्त्याला गेलेली असते. यावेळी मात्र अजूनही दुपारपर्यंत गोपाळपूर येथील पत्राशेडच्या बाहेर रिद्धीसिद्धी मंदिरापर्यंतच रांग पोहोचली आहे. त्यामुळे यंदा आषाढी यात्रेकरुंच्या संख्येत किमान 20 ते 30 टक्क्यांची घट झाल्याचे चिंताजनक चित्र आहे . सध्या गोपाळपूर आणि त्यानंतर राजाणू रोडवरील तीन किलोमीटरपर्यंतची सर्व रांग ओस पडली आहे. 


यंदा केवळ 10 ते 12 लाख यात्रेकरुच पोहोचणार असल्याचं चित्र 


उद्या आषाढी एकादशीचा सोहळा असताना सर्व भाविकांची गर्दी, मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि निवास तळ असलेल्या 65 एकर भागातच दिसून येत आहे. आज दुपारीपर्यंत पाच लाख भाविक शहरात दाखल झाले असून आज रात्री पालखी सोहळे आल्यावर अजून 5 ते 7 लाख भाविक शहरात येणार आहे. त्यामुळे उद्याच्या आषाढी एकादशीला 15 ते 20 लाख भाविकांची यात्रा भरण्याचा अंदाज असताना, यंदा केवळ 10 ते 12 लाख एवढेच यात्रेकरु पोहोचणार असे चित्र आहे. 


कर्ज काढून व्यापाऱ्यांकडून तयारी, यात्रेकरुंची संख्या रोडावल्याने चिंता वाढली


यात्रेकरुंची संख्या कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली. यंदा यात्रा विक्रमी भरण्याच्या अंदाजाने व्यापाऱ्यांनी कर्जे काढून खूप मोठी तयारी केली होती. राज्यात पाऊस सुरु होईल असे चित्र असताना पुन्हा पावसाने दडी मारल्याने वारकऱ्यांची चिंता देखील वाढली असल्याने याचा फटका आषाढी सोहळ्याला बसला आहे.


विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा


यंदा प्रथमच दर्शन रांगेत प्रत्येक 50 मीटरवर दर्शन रांग वेगाने पुढे नेण्यासाठी निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आणल्याने आता यात्रा कालावधीत दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे . यामुळे यात्रा कालावधीत 30-30 तास दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे. विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबतंच जात असतो. याचा फटका वृद्ध भाविक महिला आणि लहान मुलांना बसतो.


हेही वाचा


इंदिरा गांधींचा आषाढीचा उपवास, तर पंढरपुरात येऊनही लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठल दर्शन न घेताच परतले; वाचा विठुरायाच्या दर्शनसाठी आलेल्या राजकारण्यांचे रंजक किस्से