उपवासात अशी घ्या आरोग्याची काळजी
नवी दिल्लीः रमजान महिन्यातील रोजाचा उपवास करणाऱ्या मधुमेहांच्या रुग्णांना शारीरिक स्वास्थ्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा धोका वाढण्याची शक्यता असते. मधुमेह रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच उपवास ठेवावा, असं तज्ञांचं म्हणणं आहे.
रोजा उपवास दिवसातील 12 ते 15 तासांचा असतो. पचनक्रियेत अचानक झालेल्या बदलामुळे चयापचयक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्या काळात विशेष काळजी घ्यावी असा सल्ला तज्ञ देतात.
यामुळे वाढू शकतो धोका
दिवसातून दोन ते तीन वेळा आहार घेतल्यामुळे शर्करेच्या प्रमाणात मोठा चढ-उतार होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी, थकवा जाणवणे, सारखी तहान लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. शिवाय मधुमेहाचा धोका आणखी वाढू शकतो. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेऊन शर्करेच्या प्रमाणाविषयी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. एखादा मधुमेह रुग्ण इन्सुलिन घेत असेल तर उपवासावेळी त्याच्या प्रमाणात बदल होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
असा असावा आहार
उपवासादरम्यान मधुमेह रुग्णांनी नियमित औषधांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. उपवास सोडताना तेलकट किंवा गोड पदार्थ घेणे टाळावे. आहारामध्ये दाळ, फळं, अंडी यांसारखी प्रोटीनयुक्त पदार्थ घ्यावीत. जेवनानंतर कमीत कमी दोन तासांच्या अंतराने झोपावे, असं डॉक्टर सांगतात.