Pistachio Health Benefits : हिवाळ्यात सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स खाणे खूप फायदेशीर असते. यासाठी आहारात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांचा समावेश जरूर करावा. ड्राय फ्रुट्समधील ‘पिस्ता’ हा घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिस्ता अतिशय पोषक आणि फायबर समृद्ध ड्राय फ्रुट आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आढळतात. पिस्त्यात फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यासही देखील मदत होते. ‘पिस्ता’ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम ड्रायफ्रूट आहे. चला जाणून घेऊया दररोज पिस्ता खाण्याचे फायदे...


त्वचा आणि केस मुलायम बनवेल


पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. पिस्त्याचे तेल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. पिस्त्यात तांब्याचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळते.


अ‍ॅनिमियाची समस्या दूर होईल


पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. यामुळे अ‍ॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.


प्रतिकारशक्ती वाढेल  


पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक हे घटक आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. पिस्त्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आढळतात, जे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत.


पचनासाठी फायदेशीर


नियमित पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. त्यामुळे पोटाचा आणि पचनाचा त्रास होत नाही. पिस्ता खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पिस्त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा.


वजन नियंत्रित होईल


रोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. आपल्याला जास्त भूक लागत नाही, आपण जास्त खाणे टाळतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


मधुमेहावर नियंत्रण मिळेल


मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पिस्ता खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha