Bottle Guard juice Benefits : असं म्हटलं जातं की, जर भाज्यांमधून अधिक पोषक द्रव्ये मिळवायची असतील, तर त्यांचा रस बनवून प्यावा. दुधी ही अशा भाज्यांपैकी एक आहे, ज्याचा रस प्यायला लोकांना आवडतो. पोटॅशियमसह व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, लोह, मॅग्नेशियम, फोलेट यांसारखे सर्व आवश्यक पोषक घटक दुधीमध्ये असतात. याशिवाय यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे हा रस कॅलरी-फ्रेंडली बनतो.

दुधीच्या रसामध्ये कॅलरी आणि लिपिड्स कमी असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उत्तम पेय बनते. शिवाय, त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते आणि भूक कमी लागते. जर, रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायला, तर पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. मात्र, दुधीचा रस वजन कमी करण्यासाठी काम करत नाही, तर इतर समस्यांमध्येही गुणकारी ठरतो.

तणाव आणि नैराश्यात आराम : दुधीमध्ये कोलीनचे प्रमाण जास्त असते. हा एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जो मेंदूच्या पेशींच्या कार्यामध्ये मदत करतो आणि त्यामुळे मानसिक आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते. यासोबतच कोलीनचे प्रमाण जास्त असल्याने, तणावाची पातळी कमी करण्यास आणि नैराश्य टाळण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम :  रिकाम्या पोटी दुधी रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. दुधीमध्ये उच्च विद्राव्य फायबर असते, जे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते. परिणामी हृदय निरोगी राहते.

मुरुम कमी करते : दुधीच्या रसामध्ये क्लीन्जिग गुणधर्म असतात. हा रस आपली त्वचा आणि अंतर्गत प्रणाली डिटॉक्स करतो आणि आपल्या शरीरातील घाण, विषारी घटक आणि धूळ नष्ट करतो. याव्यतिरिक्त, हा घटक सेबम उत्पादन नियंत्रित करतो.

निद्रानाश दूर होतो : आजकाल झोपेशी संबंधित समस्या सामान्य आहेत. झोपेच्या समस्येवर उपचार करण्यासाठी देखील दुधीचा रस मदत करतो. चांगली झोप येण्यासाठी दुधीचा रस पिऊ शकता.

दुधीच्या रसाचे दुष्परिणाम

दुधीच्या रसामध्ये काही प्रमाणात विषद्रव्ये असतात, ज्यामुळे रक्तस्त्राव, अतिसार, उलट्या आणि पोटात अल्सर होऊ शकतो. दुधीमध्ये काही विषारी संयुगे असतात जसे की, टेट्रासायक्लिक ट्रायटरपेनॉइड्स, ज्याला क्युकर्बिटॅसिन म्हणतात. दुधीचा ज्यूस पिण्यापूर्वी त्याची चव घ्या. हा रस थोडा जरी कडू असेल, तरीही तो पिऊ नका. कारण तो विषारी असू शकतो आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :