National Doctor's Day 2024 : डॉक्टरांना देवाचा दर्जा का दिला जातो... हे वेगळं सांगण्याची गरज नाही.. आठवा तो कोरोनाचा भयानक काळ.. जेव्हा लोक घरात बंद होते आणि डॉक्टर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत होते, डॉक्टरांचे हे योगदान खरंच कौतुकास्पदच आहे. ते लोकांना जीवन देतात. कोणत्याही साथीच्या आजारात ते आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेतात. त्यांचा जीव वाचवतात. राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी 1 जुलै रोजी अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, जे रुग्णांना आपले कुटुंब मानतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतात. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या



राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचा इतिहास


राष्ट्रीय डॉक्टर दिन दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रसिद्ध डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश सर्व डॉक्टरांचा सन्मान करणे हा आहे. डॉ. बिधानचंद्र रॉय यांना आदरांजली वाहण्यासाठी 1991 मध्ये भारतात पहिल्यांदा डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. बंगालचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी आरोग्य व्यवस्थेत मोठे योगदान दिले होते. त्यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी पाटणा, बिहार येथे झाला. जाधवपूर राजयक्ष्मा हॉस्पिटल, महिला आणि मुलांसाठी चित्तरंजन सेवा सदन, कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटल, व्हिक्टोरिया कॉलेज आणि चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


 


त्या देवमाणसाने गरजूंकडून फी घेतली नाही..!


डॉ. बिधानचंद्र रॉय हे अत्यंत कमी शुल्कात लोकांवर उपचार करत असे. त्यांनी गरजूंकडून पैसेही घेतले नाहीत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत ते स्वतः परिचारिकेचे काम करायचे. वैद्यकीय विश्वातील त्यांचे योगदान आज अनेक डॉक्टरांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने सन 1976 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले. एवढेच नाही तर त्यांच्या निधनानंतर त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.


 


या दिवसाचे महत्त्व काय?


या दिवशी डॉक्टरांचा सन्मान केला जातो. अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी मोफत शिबिरे आणि मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात.


 


यावेळची थीम काय आहे?


या वर्षी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन 2024 ची थीम 'हीलिंग हँड्स, केअरिंग हार्ट्स' आहे. ही थीम डॉक्टरांच्या समर्पणावर भर देते. आयुष्यभर लाखो लोकांचे जीव वाचवण्यात डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे. हे त्यांच्या कार्याचे कौतुक करते आणि मानवी जीवनातील डॉक्टरांच्या भूमिकेचा सन्मान करते.


 


हेही वाचा>>>


Women Health : शरीरात अत्यंत शांतपणे पसरतो 'हा' कर्करोग! महिलांनो.. चुकूनही 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )