नवी दिल्ली : हँड सॅनिटायझरबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे. हँड सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अनेक सूचना जारी केल्या आहेत. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क आणि हाताला सॅनिटायझर वापरण्याव्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंग करण्यास सांगितले आहे. मात्र आता आरोग्य मंत्रालयाने हँड सॅनिटायझरचा जास्त वापर करणे देखील हानिकारक असू शकतं, असं म्हटलं आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. आर के वर्मा यांनी म्हटलं की, सध्याची स्थिती अभूतपूर्व आहे. कुणीही याबाबत कल्पना केली नव्हती की कोरोना व्हायरस इतका धोकादायक बनेल. नागरिकांनी स्वरक्षणासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. गरम पाणी वारंवार प्यावं. हात वारंवार धुवावे. मात्र सॅनिटायझरचा जास्त वापर करणे टाळावे.
याआधी आरोग्य मंत्रालयातील तज्ज्ञांनी सांगितलं होतं की, हँड सॅनिटायझरचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक आहे. हँड सॅनिटायझरच्या जास्त वापरामुळे त्वचेची निगा राखणारा बॅक्टेरियाही मारला जातो. तज्ज्ञांच्या मते साबण आणि पाणी पर्याय असेल तर हँड सॅनिटायझरचा वापर टाळावा. गेल्या सहा महिन्यात सॅनिटायझरचा अतिवापर होत असल्याचं समोर आलं आहे.
इतर बातम्या