Monsoon Recipe : पावसाळा म्हटला की खमंग, खुसखुशीत, चटपटीत खायची लहर येते, चहासोबत गरमागरम असं काही खायला मिळालं तर बातच न्यारी..! अशात कुटुंबाकडून विविध पदार्थांच्या मागण्या वाढतात, पण रोज काय करायचं? हा सर्वात मोठा प्रश्न महिलांसमोर असतो. त्यात ब्रेड रोल आणि ब्रेड पकोडे हा जवळपास प्रत्येकाचा आवडता पर्याय आहे, पण तुम्ही कधी ब्रेड समोसे खाल्ले आहेत का? नसेल तर पावसाळ्यात चहासोबत सर्व्ह करण्यासाठी ब्रेड समोसा हा एक उत्तम पदार्थ आहे. ब्रेकफास्ट ते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी झटपट अन् टेस्टी रेसिपी.. एकदा पाहाच...


 


दररोज नाश्त्यासाठी काय वेगळं करावं?


दररोज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काय वेगळं करावं हे अनेक महिलांना समजत नाही. पावसाळ्यात चटपटीत खावेसे वाटते. समोसे हे प्रत्येकाचे आवडते आहेत यात शंका नाही आणि जेव्हा तुम्ही ब्रेड आणता तेव्हा काही तुकडे वाया जातात. पुढच्या वेळी जर तुम्हाला चटपटीत, खमंग असं काही खावसं वाटत असेल तर तुम्ही याच ब्रेडच्या तुकड्याचे चविष्ट समोसे तयार करू शकता. संध्याकाळचे हे स्नॅक्स मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडतील. तुम्ही पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनही सर्व्ह करू शकता. यासोबतच तुम्ही ब्रेडसह अनेक प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. त्यातून तुम्ही न्याहारी ते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी चविष्ट रेसिपी बनवू शकता. 



ब्रेड समोसा रेसिपी


साहित्य


2 टीस्पून तेल, 1/2 टीस्पून जिरे, 1 इंच आले (बारीक चिरून), कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून तिखट, 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), 1/4 टीस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून आमचूर पावडर, 3 बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले), 2 चमचे धणे


इतर साहित्य- 8 स्लाईस व्हाईट ब्रेड, 2 चमचे मैदा, 2 चमचे पाणी, तळण्यासाठी तेल



बनवण्याची पद्धत


स्टफिंग तयार करण्यासाठी 2 चमचे तेल गरम करा.
जिरे, आले, हिरवी मिरची, धणे घालून परतून घ्या.
आता त्यात उकडलेले, मॅश केलेले बटाटे घाला.
नंतर मिरची पावडर, गरम मसाला, आमोचर आणि चवीनुसार मीठ घाला.
शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला.
समोसा बनवण्यासाठी ब्रेडच्या कडा कापून घ्या.
रोलिंग पिन वापरून, जास्त दाब न लावता ब्रेड पातळ करा.
त्याला त्रिकोणी आकार द्या आणि त्याचे दोन भाग करा. असे सर्व काप कापून घ्या.
दोन चमचे पाण्यात मैदा मिसळून द्रावण तयार करा.
ब्रेड स्लाइसच्या अर्ध्या भागावर लावा, दुमडून घ्या आणि हलके दाबून शंकू तयार करा.
या शंकूमध्ये एक टेबलस्पून सारण भरा आणि कड्यावर पिठाचे मिश्रण लावून चिकटवा.
सर्व समोसे तयार झाल्यावर कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हळूवारपणे सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.


 


हेही वाचा>>>


Shravan Recipe : तुमचाही श्रावणात उपवास आहे? चविष्ट आणि आरोग्यदायी उपवासाचा हा पदार्थ नक्की खा..अगदी झटपट होणारी रेसिपी


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )