Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज सोलापुरात (Solapur) शांतता रॅली (Shantata Rally) होणार आहे. यामुळं सोलापूर शहरातील शाळेांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.  यामुळं जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील विविध शाळांसह महाविद्यालयांना आणि शैक्षणिक शैक्षणिक संस्थांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  


सोलापुरात आज मोठी गर्दी होणार 


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून मराठा बांधव सोलापुरात दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात वाहनं सोलापुरच्या दिशेनं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोलापुरात आज मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळं अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.


मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज


मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव उद्या सोलापुरात एकत्र येणार आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा होणार आहे.  शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत असून 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा 7 दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे. मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता, पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज पुढाकार घेऊन कामाला लागल्याचं दिसून येत आहे. नुकतेच, मनो जरांगे सोलापूरसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना झाले असून आज त्यांचा तुळजापूर येथे मुक्काम असणार आहे. 


लाखो मराठा बांधवासाठी जेवणाची व्यवस्था


मनोज जरांगेच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात जय्यत तयारी केली आहे. रॅलीसाठी येणाऱ्या लाखो मराठा बांधवासाठी जेवणाची व्यवस्था आणि प्रत्येक 100 मीटर अंतरावर पाण्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. शांतता रॅलीत दोन मेडिकल टीम, 7 ऍम्ब्युलन्स, 20 LED स्क्रीन, 200 स्पीकर असणार आहेत.  मनोज जरांगे पाटील सकाळी 11 वाजता शहरात येणार सुरुवातीला श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन, शाहहुजूर दर्गा येथे भेट देणार आहेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करणार आहेत. यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकातून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. 


दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची शांतता रॅली निघत आहे, दुसरीकडे मनसे नेते राज ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर, आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकरही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दौरा करत आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळीच राजकीय मंडळी कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे येत्या 29 ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेणार आहेत.


महत्वाच्या बातम्या:


तुळजापुरात मुक्काम, सोलापूरातून सुरुवात; मनोज जरांगेंची शांतता रॅली पश्चिम महाराष्ट्रात, असा असेल मार्ग