Madhya Pradesh News : मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एकीकडे लहान मुलं गेम्सच्या आहारी जात आहेत तर दुसरीकडे आरोग्य विभागाने धुम्रपान (Smoking) आणि तंबाखू उत्पादनांचं सेवन (Consumption of Tobacco Products) करण्याबाबतीत धक्कादायक आकडेवारी जारी केली आहे. ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हेच्या (GYTS) अहवालानुसार मध्य प्रदेशातील मुली बिडी-सिगरेटच्या नशेत आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात मुली सरासरी वयाच्या सातव्या वर्षी सिगारेट ओढू लागतात तर मुलं सरासरी वयाच्या 11.5 व्या वर्षी सिगारेट ओढतात. मध्य प्रदेशात वयाच्या सातव्या वर्षी सिगरेट (Cigarettes)पिणाऱ्या मुलींचा आकडा 9.3 टक्क्यांच्या पार पोहोचला आहे तर बिडी (Bidi) पिणाऱ्या मुली 13 टक्के आहेत. 


राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (National Health Mission) संचालक प्रियंका दास यांनी उमंग स्कूल हेल्थ अॅण्ड वेलनेस कार्यक्रमातील सादरीकरणात हे आकडे जाहीर केले. या कार्यक्रमात मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ प्रभुराम चौधरी यांनी ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हे च्या सर्वेक्षण अहवालाचं प्रकाशन केलं.


एकीकडे मध्य प्रदेशात शिवराज सरकार नशा मुक्ती अभियान राबवत आहे. त्याचवेळी आरोग्य विभागाकडून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामुळे केवळ आरोग्य विभागच नाही तर सरकारचंही टेंशन वाढवलं आहे.


100 पैकी 7 मुली करतात सिगरेटचं सेवन
गेल्या काही वर्षात मध्य प्रदेशात नशा करणाऱ्या मुलींची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य विभागाने केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात ही आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. नॅशनल हेल्थ मिशनच्या संचालक प्रियंका दास यांच्यानुसार, मध्य प्रदेशच्या 100 पैकी 7 मुली सिगरेट पितात तर 11.1 टक्के मुली बिडी ओढतात. दारु आणि ड्रग्जचं सेवन करणाऱ्या मुलींची संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. सर्वेक्षणात अशी बाब ही समोर आली आहे की सरासरी वयाच्या 7 वर्षीच मध्य प्रदेशात मुली धुम्रपान करण्यास शिकतात.


सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगते?
सर्वेक्षणाच्या अहवालात पुढे म्हटलं आहे की, "देशातील सिगारेट ओढणाऱ्या मुलींचं सरासरी वय 9.3 वर्षे आहे तर मुलांचे सरासरी वय 10.4 वर्षे आहे. त्याचवेळी मध्य प्रदेशात सिगारेट ओढण्यास सुरु करणाऱ्या मुलींचं सरासरी वय 8.5 वर्षे आहे तर मुलांचं सरासरी वय 11.5 वर्षे आहे. राज्यात सुमारे 2.10 टक्के मुली सिगारेट ओढतात आणि 2.40 टक्के मुलं सिगारेटचे सेवन करतात. त्याचप्रमाणे, जवळपास 2.30 टक्के मुलं आणि 1 टक्के मुली बिडी ओढतात. राज्यात सुमारे 4.40 टक्के मुले आणि 3.50 टक्के मुली तंबाखूचं सेवन करतात. या मुला-मुलींचे सरासरी वय 13 ते 15 वर्षांच्या दरम्यान आहे."


आरोग्य विभाग आणि सरकारची चिंता वाढली
दरम्यान मुलींमध्ये वाढणाऱ्या नशेच्या व्यसनाच्या ताज्या आकडेवारीने आरोग्य विभागासह सरकार आणि पालकांचीही झोप उडवली आहे. त्यांची चिंता वाढली आहे. या आकडेवारीनंतर आरोग्य विभाग जनजागृती अभियान राबवून तरुणाईला जागरुक करण्याचे प्रयत्न करत आहे.


हॉस्टेल किंवा रुम घेऊन राहणाऱ्या मुली नशेत आघाडीवर
दरम्यान, मध्य प्रदेशात 25 टक्के तरुण नशेच्या आधीच आहारी गेले होते. आता मुली देखील नशेच्या बाबतीत मुलांच्या बरोबरीने दिसत आहेत. अभ्यास किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात हॉस्टेल किंवा खासगी रुम घेऊन राहणाऱ्या मुलींमध्ये सर्वाधिक नशा करत असल्याचं समोर आलं आहे.


VIDEO : Madhya Pradesh : एमपीमध्ये मुलींचं सिगारेट पिण्याचं प्रमाण जास्त, वयाच्या 7 वर्षातच मुली सिगारेट ओढतात