मुंबई : वीकेंड म्हटलं की मुंबईकरांची पावलं समुद्रकिनाऱ्यांवर वळतात. मुंबईत मरिन ड्राईव, गिरगाव चौपाटी, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी, वर्सोवा बीच, अक्सा बीच, दाना पानी बीच असे अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. पण दर वीकेंडला आपल्या खास प्रियजनांसोबत याच बीचवर जाऊन बोअर झाला आहात? तर मग मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई तालुक्यातील शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे तुमच्यासाठी एक बेस्ट डेस्टिनेशन ठरु शकतात. तुम्ही पण जर वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. जाणून घेऊन हे समुद्रकिनारे कोणते आणि तिथे कसं जायचं?


वसई तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे


1. अर्नाळा
वसई तालुक्यातील एक मोठं बंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी अर्नाळाची ओळख. अर्नाळा बीचवर जाण्यासाठी मुबलक प्रमाणात वाहतूक व्यवस्था असल्याने पर्यटकांची पावलं अर्नाळा बीचकडे वळतात. अर्नाळा बीचपासून जवळच समुद्रात अर्नाळा हा सागरी किल्ला आहे. अर्नाळा बंदरातून बोटीने अर्नाळा किल्ल्यात जाता येते.




कसे जाल?
विरार रेल्वे स्थानकात उतरावे. विरार पश्चिमेला एसटी किंवा वसई-विरार परिवहन सेवेच्या बसने अर्नाळा गावात उतरावे. अर्नाळा गावात जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून रिक्षा देखील उपलब्ध होतात.


2. नवापूर
अर्नाळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला एक शांत बीच तो म्हणजे नवापूर. नवापूर हे एक निसर्गरम्य गाव असून बीचजवळच विविध फुलांची शेती केली जाते. खासकरून सायंकाळच्या वेळी या बीचवर अत्यंत रम्य वातावरण असते.




कसे जाल?
नवापुर बीचला जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून वसई–विरार परिवहन सेवेची नवापूर बस पकडावी. नवापूर गावात उतरल्यावर चालत साधारण अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यावर नवापूर बीचला पोहोचाल.


3. राजोडी
वसई तालुक्यातील राजोडी समुद्रकिनारा हा देखील आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. कारण तुम्हाला वॉटर स्पोर्टस् ॲक्टिव्हीटी आवडत असतील तर तुमच्यासाठी हा बीच नक्कीच एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकतो. या बीचवर अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येतो.




कसे जाल?
राजोडी बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई विरार परिवहन सेवेची बस पकडावी. 


4. कळंब
वसई तालुक्यातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अशी कळंबची ओळख आहे. समुद्रकिनारा विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येतो. सायंकाळी सूर्यास्ताचा देखावा अतिशय मन मोहून टाकतो.




कसे जाल?
कळंब बीच गाठण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून कळंब गावात जाणारी बस पकडावी. तिथून पुढे चालत जावे लागते. खासगी वाहन किंवा रिक्षाने थेट कळंब बीचपर्यंत जाता येतं.


5. भुईगाव
भुईगाव हा वसईतील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या बीचवर दाट सुरूचे वन आहे. अनेकजण प्री वेडिंग शूटसाठी या बीचला पसंती देतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेली सुरुच्या झाडांची हिरवळ मन मोहून टाकते.




कसे जाल?
भुईगाव बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई-विरार परिवहन सेवेची भुईगाव बस पकडावी.


6. रानगाव
रानगाव हा ही एक शांत समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथले वातावरण अत्यंत रम्य होऊन जाते.




कसे जाल?
रानगाव समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून रिक्षा पकडावी.


7. सुरुची बीच
नावाप्रमाणेच या बीचवर सुरुची झाडे आहेत. वसईच्या दक्षिणेला हा बीच आहे. खासकरून प्रेमी युगूलांसाठी हा समुद्रकिनारा विशेष आकर्षण आहे. 




कसे जाल?
सुरुची बीचला जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून भास्कर आळी बस पकडावी.