Lifestyle: प्रसिद्ध कथाकार जया किशोरी (Jaya Kishori) यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. सोशल मीडियावर ज्यांचे प्रेरणादायी व्हिडीओ खूप व्हायरल होत आहेत. एक वक्ता असण्यासोबतच जया यांच्या साध्या राहणीमानाला लोक खूप पसंत करतात, पण काही दिवसांपूर्वी जया किशोरी यांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ इतका व्हायरल झाला की नेटकऱ्यांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले आहे. निमित्त होतं ते म्हणजे त्यांची बॅग.. ही कोणतीही साधीसुधी बॅग नव्हती.. ही एक अलिशान नामांकित कंपनीची लेदर बॅग होती. ज्यावरून लोकांनी आश्चर्यासोबतच त्यांना चांगलच ट्रोल केलंय. यावर जया किशोरी यांनी स्वत: मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडलीय. काय घडलं नेमकं? जाणून घेऊया..
नेमकं काय घडलं?
जया किशोरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या विमानतळावर होत्या आणि एक आलिशान डायर बॅग घेऊन जाताना दिसल्या होत्या, या बॅगची किंमत अंदाजे 2,10,343 रुपये आहे. ही बॅग चामड्याची असल्याचा दावा केला जात होता, तसं पाहायला गेलं तर आपल्या कथांमध्ये जया किशोरी लोकांना अशा गोष्टी आणि भ्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे लोकांनी त्याला ट्रोल केले होते.
'देवाबद्दल बोलतात पण स्वतः लेदर बॅग वापरतात.?' नेटकरी म्हणतात..
प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांना एका बॅगवरून सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. लोकांनी दावा केला की, जया किशोरी देवाबद्दल बोलतात पण स्वतः लेदर बॅग वापरतात. याबाबत सोशल मीडियावर लोकांनी जया किशोरींना फटकारले, मात्र आता खुद्द जया किशोरी यांनीच यावर स्पष्टीकरण देत बॅगबाबतची सत्यताही सांगितली आहे. जय किशोरी म्हणाल्या, “ही बॅग कस्टमाईज्ड बॅग आहे. यामध्ये लेदर नाही आणि कस्टमाइज्ड म्हणजे तुम्हाला हवे तसे बनवू शकता. त्यामुळे त्यावर माझे नावही लिहिले आहे. मी कधीही चामड्याचा वापर केला नाही आणि करणारही नाही. माझ्या कथा ज्यांच्या समोर आल्या आहेत त्यांना हे चांगलंच माहीत आहे की मी कधीही असं म्हटलं नाही की, सर्व काही मोह माया आहे, पैसे कमवू नका किंवा सर्वकाही त्याग करा. मी कशाचाही त्याग केला नाही, मग मी तुम्हाला असे करण्यास कसे सांगू शकते?"
'मी संत, साधू किंवा साध्वी नाही....' जया किशोरी म्हणतात...
मी संत, साधू किंवा साध्वी नाही हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे, असेही जया किशोरी म्हणाल्या. मी एक सामान्य मुलगी आहे, मी एका सामान्य घरात राहते, मी माझ्या कुटुंबासोबत राहते. मी तरूणांनाही सांगतो की मेहनत करा, पैसे कमवा, स्वतःला चांगले आयुष्य द्या, तुमच्या कुटुंबाला चांगले आयुष्य द्या आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा.
कोण आहेत जया किशोरी?
13 जुलै 1995 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या जया किशोरी लहानपणापासूनच आध्यात्मिक आणि प्रेरक भाषणांशी संबंधित आहेत. ती देशातील प्रसिद्ध कथाकार असून एक प्रेरक वक्ताही आहे. जया किशोरी म्हणाल्या की, ती ऋषी किंवा संत नसून देवाबद्दल बोलणारी एक सामान्य मुलगी आहे.