नवी दिल्ली : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी लूट आता थांबणार आहे. कारण गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या इंप्लांटची किंमत सरकारने निश्चित केली आहे. एनपीपीए म्हणजेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे.
पहिल्यांदा करण्यात येणाऱ्या गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची किंमत इंप्लांटमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांवर अवलंबून असेल. गुडघा प्रत्यारोपणासाठीच्या इंप्लांटची सर्वात कमी किंमत ही 4 हजार 90 रूपये, तर सर्वात जास्त किंमत ही 38 हजार 740 रूपये निश्चित करण्यात आल्याचं एनपीपीएच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
शिवाय दुसऱ्यांदा गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची असल्यास इंप्लांटची कमाल किंमत 62 हजार 770 रूपये निश्चित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या किंमती लवकरच सरकार निश्चित करेल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सरकारने या किंमती निश्चित केल्या आहेत.
या किमती सर्व उत्पादकांसाठी बंधनकारक आहेत. ज्या इंप्लांटच्या किमती सरकारने निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त आहेत, त्यांच्या किंमती कमी करण्यात याव्यात, असं एपीपीएने म्हटलं आहे.
सर्व उत्पादकांनी आणि विक्रेत्यांनी नव्या किमती रुग्णांसाठी उपलब्ध करून देणं बंधनकारक असेल. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णालयातून रुग्णाला इंप्लांट खरेदी करायचं नसल्यास रुग्णालयं रुग्णांवर बंधन घालू शकत नाही. शिवाय इंप्लांटची बाजारात टंचाई भासू नये, अशी ताकीदही सरकारने उत्पादकांना दिली आहे.
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2017 10:16 AM (IST)
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या इंप्लांटची किंमत सरकारने निश्चित केली आहे. त्यामुळे ग्राहकांची लूट थांबून आता प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही स्वस्त होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -