HFMD In Child : पालकांसाठी महत्वाची बातमी. सध्या लहान मुलांमध्ये एक आजार बळावतोय. त्या आजाराचं नाव आहे हॅन्ड फुट माऊथ (mouth hands and feet). हॅन्ड फुट माऊथ अर्थात एचएफएमडी (HFMD). लहान मुलांच्या हात पाय, तोंडामध्ये प्रामुख्यानं फोड येतात. काही मुलांच्या सर्व अंगावर देखील हे फोड येतात. हा काहीसा चिकनपॉक्स सारखाच प्रकार आहे पण चिकनपॉक्स नाही असं डॉक्टर सांगतात.
मुख्यत्वेकरुन 2 ते 5 वर्षांच्या बालकांमध्ये हा आजार बळावत असल्याचं दिसून येत आहे. हा आजार मुलांना झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवावं म्हणजे दुसऱ्या मुलांपासून दूर ठेवावं असा सल्ला डॉक्टर देतात. या आजारातून मुलं बरी होण्यासाठी सात ते दहा दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळं या कालावधीत मुलांना शाळेत, सार्वजनिक ठिकाणी पाठवू नये, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
काय आहेत हॅन्ड फुट माऊथ अर्थात एचएफएमडी (HFMD)ची लक्षणं
या आजारात हॅन्ड फुट माऊथ अर्थात एचएफएमडी (HFMD) म्हणजे हात पाय आणि तोंडाचा आजार म्हटलं जातं. 5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये हे व्हायरल संक्रमण आढळून येतं. यामध्ये मुलांच्या तोंडामध्ये तसेच शरीराच्या विविध भागात फोड येतात. यामुळं मुलांना खाण्यापिण्यासाठी त्रास होतो. हा आजार कॉक्ससॅकी व्हायरसमुळं होतो. यामध्ये मुलांना हलकासा ताप देखील येतो. या दरम्यान मुलं सतत चिडचिड करतात. तसेच मुलांना अंगदुखीचा त्रास देखील होतो.
लहान मुलांचे डॉक्टर शैलेश काबरा सांगतात की, सध्या दवाखान्यामध्ये अशा मुलांचं प्रमाण वाढत आहे. यावर अद्याप कुठली लस किंवा औषध उपलब्ध नाही. मात्र या काळात मुलांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवणं महत्वाचं आहे. शिवाय मुलांना काही काळासाठी आयसोलेशन म्हणजे दुसऱ्या मुलांपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. या काळात मुलांना सतत पाणी द्यावं, तसेच तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही काबरा यांनी सांगितलं.
मुलांची काळजी कशी घ्यावी
इतर मुलांना संसर्ग झालेल्या मुलांपासून दूर ठेवा.
हा खोकला, शिंकणे आणि लाळेतून पसरणारा आजार आहे.
संक्रमित मुलासोबत खानपान शेअर करु नये
मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या.
आपल्या मुलाचे हात वारंवार साबणाने धुवा.
या काळात मुलांना सतत पाणी द्या.
तात्काळ आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या.
इतर महत्वाच्या बातम्या