मुंबई : उच्च रक्तदाब ही ( High Blood Pressure) आरोग्याशी निगडित एक धोकादायक बाब आहे. ही बाब आजारपण आणि मृत्यूंसाठी सर्वाधिक जबाबदार असल्याचे दिसते. वेळीच उपचार न केल्यास तसेच अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तवहिन्यासंबंधी रोगामुळे रक्तवाहिन्यांना दीर्घकाळ नुकसान होते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे देखील नुकसान होऊ शकते, असे डॉक्टरांनी म्हटले. 


उच्च रक्तदाबाला "सायलेंट किलर" म्हणून  ओळखले जाते. या आजाराची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या लहान, नाजूक असतात. रक्तवाहिन्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि अवयवापर्यंत रक्त वाहून नेण्याचे काम करतात. जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा रक्तवाहिन्या कडक होतात किंवा अरुंद होतात. अशा परिस्थितीत, रक्तवाहिन्या शरीरात पुरेसे रक्त वाहून नेण्यास सक्षम नसतात. यामुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले. 


मुंबईतील 'अपोलो स्पेक्ट्रा' व्हॅस्कुलर स्पेशालिस्ट डॉ. शिवराज इंगोले म्हणाले की, रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून नेण्यासाठी जो मार्ग तो आवश्यकतेनुसार रुंद किंवा अरुंद होतो. जेव्हा हा मार्ग रुंद होतो, तेव्हा रक्तदाब कमी असतो. हा मार्ग जेव्हा अरुंद होतो, तेव्हा रक्तदाब जास्त असतो. कालांतराने हा दाब तुमच्या रक्तवाहिन्यांच्या नाजूक अस्तरांना हानी पोहोचवू शकतो, ज्यामुळे कमी लवचिक कमी होऊन नुकसान होण्याची अधिक शक्यता अधिक असते असेही त्यांनी म्हटले. 


उच्च रक्तदाब असलेल्या बहुतांश लोकांना सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे तुमची संपूर्ण रक्ताभिसरण प्रणाली धोक्यात येऊ शकते. तुमच्या रक्तवाहिन्यांवर दीर्घकाळापर्यंत येणाऱ्या ताणामुळे प्लेक्स तयार होऊ शकतात. हे तुमच्या धमन्या अरुंद आणि ब्लॅाक करू शकतात, ज्यामुळे रक्त प्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असेही डॉ. इंगोले यांनी म्हटले. 


'झायनोव्हा शाल्बी' रुग्णालयातील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. मित्तल भद्रा म्हणाले की, अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या कमकुवत आणि अरुंद होतात, ज्यामुळे गुठळ्या होण्याची अधिक शक्यता असते आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका देखील वाढतो. अशा स्थितीत धमन्यांमध्ये फॅट जमा होते आणि त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. अवयवांचे नुकसान होईपर्यंत अनियंत्रित उच्चरक्तदाबाची कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत. स्ट्रोक, एमआय आणि किडनीचे आजार शोधण्यासाठी आणि त्यास प्रतिबंध करण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.


डॉ. भद्रा पुढे म्हणाले की, उच्चरक्तदाब ही आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करणारी समस्या आहे. हे स्ट्रोक, किडनी रोग यासारख्या गंभीर परिस्थितीस कारणीभूत ठरु शकतात. उच्चरक्तदाब आटोक्यात आणण्याजोगा आणि टाळता येण्याजोगा आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करुन तुमच्या रक्तदाबावर लक्ष ठेवावे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल किंवा ठराविक औषधांचा सल्ला दिला जातो . नियमित व्यायाम, सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी असलेला संतुलित आहार आणि अतिमद्यपान आणि तंबाखूचे व्यसन टाळणे हे उच्चरक्तदाब नियंत्रित करण्यासाठीचे महत्त्वाचे आहे. 


(विशेष सूचना : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. औषधोपचार, आरोग्य विषयक सल्ल्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)