World Heart Day 2023 : दरवर्षी 29 सप्टेंबरला जागतिक हृदय दिन (World Heart Day) पाळला जातो. या दिवशी हृदयाचे आरोग्‍य चांगले ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी जनजागृती केली जाते. पण हृदयाच्‍या आरोग्‍याची काळजी घेताना शरीरातील अन्य घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यातलंच एक नाव म्हणजे कोलेस्‍ट्रॉल आणि व्‍यक्तीच्‍या हृदयावर होणारे त्‍याचे परिणाम.


कोलेस्ट्रॉलच्या दरवर्षी सुमारे 4.4 दशलक्षहून अधिक केसेस समोर येतायत. ज्‍यामधून असे निदर्शनास येते की उच्‍च कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांमुळे हृदयविषयक आजार आणि कार्डियोव्‍हॅस्‍कुलर समस्‍यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्‍याच्‍या उपायांबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.


हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी 5 उपाय पुढीलप्रमाणे :


1. नियमित तपासणी आणि वैद्यकीय मार्गदर्शन 


कोलेस्‍ट्रॉलच्‍या उत्तम व्‍यवस्‍थापनासाठी त्‍याबाबत माहिती असणे आवश्‍यक आहे. कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर देखरेख ठेवण्‍यासाठी आणि हृदयाचे आरोग्‍य तपासण्यासाठी वेळीच डॉक्टरांकडे तपासणी करा. योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि आरोग्‍याबाबत माहिती मिळाल्याने तुम्‍ही कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवू शकता.


2. व्‍यायाम करा आणि सक्रिय राहा


नियमित व्‍यायाम हृदयाचे आरोग्‍य आणि कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्वाचा आहे. कोलेस्‍ट्रॉल पातळ्या सुधारण्‍यासाठी जलद चालणे, जॉगिंग, पोहणे किंवा सायकल चालवणे अशा मध्‍यम स्‍वरूपाचे व्‍यायाम करा. व्‍यायाम केल्‍याने एचडीएल कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होते, तसेच वजनावर नियंत्रण राहते, लठ्ठपणाशी संबंधित कोलेस्‍ट्रॉलचा धोका कमी होतो. 


3. योग्य आहार घ्या 


आहाराचा तुमच्‍या कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर परिणाम होतो. जेवणामध्‍ये हृदयाच्‍या आरोग्‍याला अनुकूल खाद्यपदार्थांचा समावेश करा, ज्‍यामध्‍ये फायबर आणि पौष्टिक घटक असतील. ज्‍यामुळे एलडीएल ('बॅड') कोलेस्‍ट्रॉल कमी होईल. आरोग्‍यदायी आहारासह योग्‍य वैद्यकीय सल्‍ला आरोग्‍यदायी हृदयासाठी आवश्‍यक आहे. 


4. वजन नियंत्रित ठेवा


अधिक वजन, विशेषत: कमरेभोवती असलेल्‍या अधिक चरबीमुळे एलडीएल कोलेस्‍ट्रॉलमध्‍ये वाढ होऊ शकते. संतुलित आहाराचे सेवन व नियमित व्‍यायाम करत वजन कमी केल्‍याने कोलेस्‍ट्रॉल प्रोफाइलमध्‍ये वाढ होते. वजन संतुलित असल्‍याने हृदयविषयक आजाराचा धोका कमी होतो आणि एकूण आरोग्‍य उत्तम राहते. 


5. वाईट सवयी टाळा  


धूम्रपान आणि अधिक प्रमाणात मद्यपानाचा हृदयाचे आरोग्‍य आणि कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर घातक परिणाम होऊ शकतो. धूम्रपानामुळे रक्‍तवाहिन्‍यांचे नुकसान होते, ज्‍यामुळे कोलेस्‍ट्रॉल वाढते. धूम्रपान सोडणे आणि मद्यपानाचे प्रमाण कमी अशा बाबींसह हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्‍य द्या.   


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा