SideEffects Of Eating Tomato : जगातील बहुतेक लोकांना टोमॅटो ( Tomato ) खायला प्रचंड आवडतं. अनेकांना तर टोमॅटोपासून बनवलेली चटणी आवडते. आपण दररोज बनवत असलेल्या भाजीही टोमॅटोशिवाय बनत नाही. आपल्या प्रत्येकाच्या जेवणात टोमॅटोचा समावेश असतो. अगदी सलाड म्हणूनही कच्चे टोमॅटो खातात. काहीजण टोमॅटोला मीठ लावून चवीनं खातात. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यामुळे नुकसानही होऊ शकतं. अगदी असंच टोमॅटोच्या बाबतीत आहे. कारण प्रमाणबाहेर टोमॅटो खाल्यामुळे (SideEffects Of Eating Tomatoes) तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. टोमॅटोमध्ये विटामिन, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सचं भरपूर प्रमाण असतं, जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण प्रमाणाबाहेर टोमॅटो खाल्यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...
अॅसिडिटी वाढू शकते
टोमॅटो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन सी भरपूर असतात. तसेच टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात प्रॉपर्टीज आढळून येतात. त्यामुळे प्रमाणाबाहेर टोमॅटो खाल्यामुळे अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. हे लक्षात घेऊन टोमॅटो मर्यादित प्रमाणात खायला हवं.
गॅसची समस्या
जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असेल किंवा नेहमी पोटात गॅस होत असेल, तर जास्त टोमॅटो खाणं टाळा. कारण टोमॅटोमुळे पोटात गॅस तयार होऊ शकतो. त्यामुळे गॅसच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवायचं असेल, तर मर्यादित प्रमाणात टोमॅटो खायला हवं. अन्यथा टोमॅटोपासून फायदे कमी आणि नुकसान जास्त होऊ शकतं.
मूतखडा होऊ शकतो
ज्या लोकांना मूतखड्याचा त्रास आहे, अशा लोकांनी टोमॅटो खाणं टाळावं. कारण टोमॅटोमध्ये असणाऱ्या बियांमुळे मूतखड्याचा त्रास अधिक वाढू शकतो. जर तुम्हाला टोमॅटो खायची इच्छा निर्माण झाली, तर टोमॅटो सोलून त्यातील बिया बाजूला करा आणि मग टोमॅटो खा. अन्यथा टोमॅटो खाणं टाळा.
छातीत जळजळ होणं
टोमॅटो हे आरोग्यासाठी कितीही फायदेशिर असले, तरी प्रमाणाबाहेर टोमॅटो खाल्यामुळे अनेक लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. जसे की, छातीत जळजळ होणं, आंबट ढेकर येणं अशा समस्या येऊ शकतात. याचं कारण टोमॅटोमध्ये विटामिन सी भरपूर असतात. यामुळे पोटात गॅस तयार होऊ शकतो आणि छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात टोमॅटो खायची सवय असेल, तर वेळीच सावध व्हा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)