Rainy Season and Health:  ऋतुमानातील बदलामुळे अनेकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. ऋतु बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजाराने अनेकजण त्रस्त असतात. पावसाळ्यात केवळ डोळ्यांचे किंवा त्वचेशी संबंधित आजार नव्हे तर कानाचा संसर्गही मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये अशा प्रकारच्या समस्या आढळून येतात. हे संक्रमण कानाच्या आतील, मध्यभागी किंवा बाह्य भागावरही परिणाम करू शकते. पावसाळ्यात कानात ओलावा राहिल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. कानासंबंधीत संसर्गापासून दूर राहण्याकरिता काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 


पावसाचे दूषित पाणी कानात शिरून बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. या दिवसांत आर्द्रतेची पातळी वाढल्याने सहाजिकच बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण मिळते. जीवाणूंच्या वाढीसाठी हा पोषक काळ असून या दिवसात पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सामान्यतः ओटोमायकोसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या कानाच्या बुरशीजन्य संसर्गामुळे  कानात वेदना जाणवू लागतात. संक्रमणाची इतर कारणे म्हणजे सर्दी किंवा फ्लू आणि ऍलर्जी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हेमोफिलिक इन्फ्लूएन्झा सारखे जीवाणुंमुळे एखाद्या व्यक्तीला कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते, असे अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले यांनी म्हटले आहे. 


लक्षणे कोणती ?


ज्यांना कानाचा संसर्ग झाला आहे, त्यांना कान बंद होणे, खाज सूटणे, सूज येणे, कान दुखणे, ऐकू कमी येणे, कानावाटे पाण्यासारखा स्त्राव बाहेर पडणे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. लक्षणे दिसल्यानंतर वेळीच निदान व उपचार करणे गरजेचे आहे. 


पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या कानांची काळजी : 


कानाशी संबंधित आजार असल्यास उपचारास विलंब करू नका. दुर्लक्ष केल्याने संसर्ग आणखी वाढू शकतो. कानात टाकायचे ड्रॅाप्स आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा वापर करा. कानाची  नियमित तपासणी करुन घ्या. अंघोळीनंतर कान स्वच्छ आणि कोरडे करा. इअरवॅक्स काढण्यासाठी इअरबड्स वापरणे टाळा. यामुळे दुखापत होऊ शकते आणि तात्पुरती श्रवणशक्ती कमी होऊ शकते. 


पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थ खाऊ नका. त्यामुळे कान दुखणे आणखी वाढू शकते. जर तुम्हाला घशाचा संसर्ग असेल तर चहा, कॉफी किंवा इतर गरम पेयांचे सेवन करा. घशाचा संसर्ग टाळण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा, स्वच्छ कपड्याने कान स्वच्छ करा.  जेव्हा सर्दी होते तेव्हा जोराने नाक शिंकरणे हे टाळा. त्यामुळे देखील कानाचा संसर्ग वाढू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 


(Disclamir: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. आजाराचे निदान, उपचारासाठी आपल्या डॉक्टरांचा, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)


इतर महत्त्वाच्या बातम्या: