Heart Transplant from Pig : एका 57 वर्षाच्या व्यक्तीला डुकराचे (Pig ) हृदय बसवण्यात आले होते. डुकराचे हृदय बसवल्यानंतर हा माणूस तब्बल दोन महिने जगला. मात्र दोन महिन्यानंतर या व्यक्तिचं निधन झालं आहे. डेव्हिड बेनेट असं या व्यक्तिचं नाव आहे. डेव्हिडचं हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant) करुन त्याला डुकराचं हृदय बसवण्यात आलं होतं. जानेवारी महिन्यात डेव्हिडला डुकराचं हृदय बसवलं होतं. डेव्हिडच्या मुलानं आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.  


माणसाला डुकराचे (Pig ) हृदय बसवण्याचा जगातील पहिलाच प्रयोग अमेरिकेत (United States) झाला होता. अमेरिकेतील औषध नियामक संस्थेने नव्या वर्षाच्या सुरूवातीला या सर्जरीला परवानगी दिली होती. त्यानुसार मागच्या शुक्रवारी डॉक्टरांनी डुकराचे हृदय या व्यक्तीच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करून त्याचे प्राण वाचवले होते.  


युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने एक निवेदन जारी करून या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली होती. हृदय प्रत्यारोपणाची सर्जरी झाल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित रूग्ण व्यवस्थित झाला. या यशस्वी सर्जरीनंतर आता अवयव दानातील कमतरता भरून निघेल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. 


हृदय प्रत्यारोपण केलेले डॉ. बार्टले ग्रिफिथ यांनी सांगितलं होतं की, हृदय दान करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. या प्रयोगाने अवयव दानाची कमतरता भरून निघणार आहे. हा प्रयोग भविष्यात रूग्णांसाठी महत्वाचा आहे. 


डेव्हिड बेनेट याच्यावर शस्त्रक्रिया करत डुकराचे हृदय काढून डेव्हिडला लावलं होतं.  शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याच्या हृद्याचे काम सुरु राहावं म्हणून ते एका विशेष उपकरणात ठेवले होते अशी माहिती प्रत्यारोपण पथकाने दिली होती. 


डेव्हिडने शस्त्रक्रियेच्या एक दिवस आधी सांगितलं होतं की, आपल्यासमोर मृत्यू आणि प्रत्यारोपण हे दोनच मार्ग आहेत. प्रत्यारोपण यशस्वी झाले तर जगण्याची आशा आहे. जगण्यासाठी हा माझा शेवटचा पर्याय होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हार्ट-लंग बायपास मशिनच्या मदतीने मी जगत आहे. या सर्जरीमुळे आता मी पुन्हा उभा राहीन, अशी आशा असल्याचे डेव्हिडने सांगितले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर काल डेव्हिडचं अखेर निधन झालं.