Loneliness: आजकाल आपण पाहतो, बरीच लोक एकटं राहणं पसंत करतात, काहींना त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगायला खूप आवडते. ज्यामुळे लोकांमध्ये एकटेपणा वाढत चालत असल्याचं समोर येतंय, त्याची अनेक वैयक्तिक कारणंही असू शकतात, पण तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, की एकटेपणा (lonliness) हा केवळ वैयक्तिक समस्या नाही, तर आता तो आरोग्यासाठी (Health) गंभीर धोक्याचा विषय ठरत चालला आहे. तज्ज्ञांचा असा दावा आहे की... एकटेपणाचे परिणाम हे दिवसाला तब्बल 15 सिगारेट ओढल्याइतके धोकादायक आहेत. जाणून घेऊया या संदर्भात..
कोविड-19 महामारी दरम्यान एकटेपणाची पातळी वाढली?
जगात वाढत चाललेल्या एकटेपणाबद्दल जागतिक आरोग्य संख्येने देखील चिंता व्यक्त केलीय. कोविड-19 महामारीदरम्यान बहुतांश सामाजिक संवाद थांबले असून, त्यामुळे लोकांमध्ये एकटेपणाची पातळी वाढली असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. मानसिक आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, आज अनेक लोक चिंता आणि नैराश्याने ग्रस्त आहेत, पण त्यावर उपाय शोधण्यासाठी पुढे येण्यास कचरतात. सोशल मीडियावर अवलंबून राहणं हे देखील मोठं कारण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
आरोग्यावर घातक परिणाम
तज्ज्ञांच्या मते, एकटेपणाचे आरोग्यावरचे परिणाम लठ्ठपणा किंवा शारीरिक निष्क्रियतेपेक्षा गंभीर आहेत. द गार्डियन च्या अहवालानुसार, वृद्धांमध्ये एकटेपणामुळे डिमेन्शियाचा धोका 50 टक्क्यांनी आणि हृदयविकार- स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांनी वाढतो.
एकटेपणा म्हणजे काय?
एकटेपणा ही एक प्रकारे मानवी भावना असून ती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जाणवते. ते केवळ "एकटे राहणे" इथपर्यंतच मर्यादित नाही, तर माणूस लोकांमध्ये असूनही एकटा आणि अलिप्त वाटू लागतो, आणि यालाच खरा एकटेपणा म्हणतात. उदा. कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थी असला, तरी गर्दीत असूनही त्याला एकटं वाटू शकतं. एखादा सैनिक परदेशी देशात तैनात असताना सहकाऱ्यांच्या उपस्थितीत असूनही एकाकीपणाचा अनुभव घेतो. जो अत्यंत गंभीर असल्याचं मानसिक तज्ज्ञ सांगत आहेत.
एकटेपणामुळे होणारे धोके
- एकटेपणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. त्यात –
- दारू, अमली पदार्थांचे व्यसन
- मेंदूचे कार्य बिघडणे
- अल्झायमरचा धोका
- समाजविरोधी वर्तन
- हृदयविकार, स्ट्रोक
- स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता कमी होणे
- नैराश्य, आत्महत्या
- तणावाची पातळी वाढणे
- चुकीचे निर्णय घेणे
एकटेपणावर मात करण्याचे उपाय
- तज्ज्ञांच्या मते, एकटेपणावर मात करण्यासाठी काहीना काही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- आवडत्या उपक्रमांमध्ये सामील व्हा, नवी मैत्री करा
- नकारात्मक विचार टाळा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
- समान विचारसरणी व मूल्य असलेल्या लोकांशी संबंध प्रस्थापित करा
एकटेपणाचे दुष्परिणाम समजून घ्या
- जुन्या नात्यांना बळकटी द्या, मित्र-परिवाराशी संपर्क साधा
- विश्वासू व्यक्ती, डॉक्टर किंवा थेरपिस्टशी संवाद साधा
- एकटेपणा हा केवळ मानसिक समस्या नसून शारीरिक आजारांनाही आमंत्रण देतो.
- त्यामुळे त्यावर वेळेत उपाय करणं आणि सामाजिक नातेसंबंध जपणं हीच काळाची गरज आहे.
हेही वाचा
Health: झोप पूर्ण होत नाही? सतत टेन्शन घेताय? सावधान, हार्ट फेल्युअरचा मोठा धोका, तज्ज्ञ सांगतात...
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)