Health: आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकालाच जमत नाही. ज्याचा गंभीर परिणाम शरीरातील अवयवांना भोगावा लागतो. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा अनियमित झाल्या असून मानसिक ताण देखील वाढत चालला आहे. अपूर्ण झोप आणि दीर्घकालीन तणावाचा थेट परिणाम हा हृदयाच्या आरोग्यावर होतोय. आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, तणाव आणि अपुरी झोप हे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतात. वेळीच काळजी आणि जीवनशैलीतील बदल करुन गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. याबाबत नवी मुंबईतील वाशी येथील न्यूईराहॉस्पिटलचेकार्डिओलॉजीस्ट डॉ. गौरव सुराणा यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

हृदयासाठी हानिकारक 'या' गोष्टी

हृदयाच्या स्नायूंचे आरोग्य बहुतेकदा केवळ आहार, व्यायाम आणि जीवनशैलीच्या सवयींशी जोडले जाते, परंतु दीर्घकालीन तणाव आणि झोपेचा अभाव हृदयासाठी तितकाच हानिकारक ठरतो आहे. दीर्घकाळापर्यंत ताण आणि निद्रानाश हे शरीरीक संतुलन बिघडवतात, रक्तदाबाची समस्या , हार्मोनलबदलांना कारणीभूत ठरतात आणि हृदयावर अतिरिक्त ताण निर्माण करतात. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि जीवघेणी गुंतागुंत टाळण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राखणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वाढतायत..

सध्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वेगाने वाढत आहेत. हृदयाच्या समस्या या चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींमुळे उद्भवतात. याव्यतिरिक्त तणाव, अपुरी झोप, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अनुवांशिक घटक देखील यास कारणीभूत ठरतात. तणावामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. कालांतराने यामुळे उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचे ठोके आणि हृदयविकाराचा किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. छातीत दुखणे, धडधडणे, चिडचिड आणि थकवा ही लक्षणे दिसून येतात. शिवाय, झोपेची गुणवत्ता खालावणे हे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाशी जोडले जाते. दीर्घकाळापर्यंत झोप न येणे हे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते आणि हार्टफेल्युअरची शक्यता वाढवू शकते ,असे डॉ. गौरव सुराणा यांनी स्पष्ट केले.

हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या 'या' गोष्टी

डॉ. गौरव सुराणा पुढे सांगतात की, वाढता तणाव आणि अपुरी झोप हे हृदयाच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात. झोप ही शरीराची नैसर्गिक दुरुस्तीची एक योग्य वेळ मानली जाते. योग्य विश्रांतीशिवाय, हृदय जास्त वेळ काम करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि अगदी हार्टफेल्युअरचा धोका वाढतो. हृदयाच्या आरोग्यासाठी आहार आणि व्यायामाइतकेचताणतणावाचे व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे. नियमित ध्यान, योग किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणे, झोपेचे वेळापत्रक पाळणे, झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन किंवा गॅझेट्सचा वापर टाळून निद्रानाश किंवा तणावासाठी वैद्यकीय मदत घेऊन घातक हृदयरोग टाळणे गरजेचे आहे.

कोणत्या वयोगटासाठी किती झोप हवी?

राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते 18 ते 64 वयोगटातील प्रौढांसाठी 7-9 तासांची झोप आणि 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकसंख्येसाठी 7 ते 8 तासांची झोप गरजेची आहे. प्रत्येकाने आपल्या हृदयाचे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, तणावमुक्त जीवनशैली जगणे आणि चांगल्या झोपेच्या सवयीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: नवा आठवडा सुरू! आजपासून 'या' 6 राशींचे नशीब पालटणार, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट, सौभाग्याचा आठवडा, साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)