Drinking Water Before Tea : तुम्ही लहानपणापासून एक चित्र पाहिलं असेल की, तुमचे आजी-आजोबा, आई-बाबा सकाळी चहा पिण्यापूर्वी आवर्जून एक ग्लास पाणी पितात. ही सवय बहुतेकांना असते. पण चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायलाचं हवं का? यामागे काही लॉजिक आहे का? चहा किंवा कॉफी पिल्यानंतर तरतरीतपणा जाणवतो. त्यामुळे लोक एनर्जी ड्रिंक म्हणूनही चहा किंवा कॉफी पिणं पसंद करतात. भारतासारख्या देशात तर चहाप्रेमींची बिल्कुल कमी नाही. आपल्या देशात तर लोक आनंदात आणि दु:खाच्या प्रसंगातही चहा पितात. आपल्यातील अनेकजण मानसिक तणाव दूर करण्यासाठीही चहा किंवा कॉफीचे कप रिचवतात. ऑफिसमध्ये काम करुन थकवा आला असेल, तर मित्रांसोबत चहा किंवा कॉफी प्यायली जातो. पण चहा पिण्यापूर्वी पाणी पिणे (Drinking Water Before Tea) आवश्यक आहे का? याविषयी सविस्तर जाणून घेऊया...


चहा पिण्याआधी पाणी पिण्याचं 'हे' आहे कारण 


रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं टाळा. यामुळे अॅसिडिटीची त्रास होऊ शकतो. बहुतांश लोकांना चहा पिण्याआधी पाणी प्यायची सवय असते. कारण यामुळे पोटात तयार होणाऱ्या अॅसिडिटीला लगाम बसतो. अॅसिडिटीमुळे पोटात त्रास होऊ शकतो. त्यामुळे चहा आणि कॉफी पिण्याआधी पाणी प्यायला विसरु नका. 


बॉडी हायड्रेट राहते


तुम्हाला चहा आणि कॉफी पिण्याची सवय असेल, तर त्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावून घ्या. याचं कारण म्हणजे चहा आणि कॉफी पिण्यामुळे बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. त्यामुळे थकवा जाणवू शकतं. त्यामुळे तुम्ही कधीही चहा पिण्याआधी एक ग्लास आवर्जून पाणी प्यायला हवं. यामुळे बॉडी हायड्रेट राहण्यास मदत होईल.


दातांची समस्या होत नाही


चहा आणि कॉफीचा अतिरेक केला, तर दाताशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. या पेयांमध्ये कॅफिन असतं. या कॅफिनमध्ये टॅनिन नावाचं एक रसायन असतं. यामुळे दातांना कीड लागू शकते. नियमित चहा आणि कॉफी पिण्यामुळे दातांवर एक थर जमा होतो. यामुळे चहा आणि कॉफी पिण्याआधी एक ग्लास पाणी प्यायल्यामुळे दात किडत नाहीत. तसेच पोटाशी संबंधित त्रासही होणार नाही. 


आरोग्यावर होईल परिणाम


तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी पिण्याची सवय असेल, तर तुमच्या शरीरावर कॅफिनचा दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे चहासारखे पेय पिण्याआधी पाणी पिणं आवश्यक आहे. 


अल्सरची समस्या होत नाही


तुम्हाला उपाशी पोटी चहा, कॉफी प्यायची सवय असेल, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या सवयीमुळे अल्सरसारखा आजारही होऊ शकते. कितीही चहा पिण्याची इच्छा निर्माण झाली तरी त्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते आणि शरीरातील पाण्याचं संतुलनही राखलं जातं. अल्सर हा आतड्याशी संबंधित आजार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)