HMPV Outbreak : कोरोनाच्या महामारीनं (Corona Pandemic) संपूर्ण जगभरात हाहाःकार माजवला होता. अख्ख्या देशाला कोरोनानं विळखा दिला होता. चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा चीनवर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत. चीनमध्ये आता नव्या व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. HMPV व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. चीनमधील बऱ्याच लोकांना ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता कोरोनानंतर जग दुसऱ्या महामारीच्या उंबरठ्यावर तर नाही ना? अशी भिती संपूर्ण जगभरात पसरली आहे.
चीनमधील HMPV व्हायरसबाबत आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी एक माहितीपर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चीनमध्ये उद्रेक झालेल्या व्हायरसला घाबरू नका, असं आवाहन केलं आहे. श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी, खोकला, ताप येतो, तो शिंका- खोकल्यातूनच पसरतो.पण कोरोनाइतका हा व्हायरस घातक नाही. 2001 मध्येच त्याला विलग करून त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासूनच आढळतात, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी सांगितली आहे.
चीनमधील HMPV व्हायरसबाबत आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे म्हणाले की, "कोरोनाचा व्हायरसचा उद्रेक झाला आणि संपूर्ण जगभरात महामारी पसरली. या महामारीत लाखो लोक मृत्यूमुखी पडले. कोट्यवधी लोक बाधित झाले. त्याचप्रमाणे 2025 च्या सुरुवातीला चीनमध्ये HMPV व्हायरसचा प्रसार झाला आहे. पण हा व्हायरस फारसा नवा नाही. या व्हायरसची साथ काही वर्षांपूर्वी अमेरिका, कॅनडासारख्या काही देशांमध्ये आली होती."
HMPV ची लागण झाल्यास रुग्ण किती दिवसांत बरा होतो?
"HMPV व्हायरस कोविडसारखा असला तरीसुद्धा कोविडप्रमाणे घातक नाही. याचा मृत्यूदरही कोविडपेक्षा कमी आहे. कोरोना व्हायरसचा जो गट होता, त्यापेक्षा हा नवा व्हायरस खूप वेगळा आहे. या व्हायरसची बाधा झाल्यानंतर बाधित व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी येणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं ही लक्षणं दिसतात. हा आजार वाढत गेला, तर न्यूमोनियासारखे आजार उद्भवू शकतात. तसेच, व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला तर ऑक्सिजन घेण्यास समस्या उद्भवू शकते. पण, तेवढा हा आजार धोकादायक नाही. साधारणतः 5 ते 10 दिवसांत हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो.
HMPV व्हायरसवर लस उपलब्ध आहे?
"HMPV व्हायरस घातक नाही, पण या आजाराची जर साथ पसरत राहिली, तर कोविड प्रमाणेच जगभरात याचीही महामारी येण्याची शक्यता असल्याची भिती अनेक देशांना वाटत आहे. पण हा आजार आधीपासूनच माहीत असल्यामुळे जर याची साथ पसरायला लागली, तर याची लस लवकर येईल, त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही.", असं आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे म्हणाले.
प्रतिबंधक उपाय काय?
"HMPV व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यावर प्रतिबंधक उपाय हे कोरोनासारखेच आहेत. म्हणजे, मास्क लावणं, गर्दीत न जाणं, दुसऱ्यांपासून अंतर ठेवणं आणि त्यासोबतच साबण किंवा सॅनिटायझरनं हात स्वच्छ ठेवणं हे उपाय आहेत. त्यामुळे घाबरु नका आणि सावध राहा.", अशी माहिती आरोग्यतज्ज्ञ अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.
HMPV व्हायरसची लक्षणं काय?
ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) या नव्या व्हायरसचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये कोरोनासदृश्य लक्षणं दिसून येतात. या व्हायरसमुळे रुग्णात अत्यंत साधारण लक्षणं दिसतात. रुग्णामध्ये खोकला किंवा घसा खवखवणं, सर्दी किंवा नाक वाहाणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारखी लक्षणं दिसतात. प्रामुख्यानं लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती या व्हायरसच्या विळख्यात अडकतात. तसेच, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींमध्ये या आजाराची गंभीर लक्षणं दिसू शकतात.
काय करावं?
- खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करणं टाळावं?
- खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
- टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.
- आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
महत्त्वाच्या इतर बातम्या :