Holi 2023 Bhang Hangover : देशभरात धुळवडीचा (Holi) आनंद लुटला जात आहे. विविध रंगांनी प्रत्येकजण न्हाऊन निघाले आहेत. कुटुंबीयांसोबत, मित्रपरिवारासोबत धुळवडीचा आनंद लुटला जातो. या सणात मिठाईचा आस्वादही घेतला जातो. परंतु आणखी एक खास पेय आहे, जे लोक होळीच्या दिवशी मोठ्या उत्साहाने पितात. थंडाई म्हणजेच भांग (Bhang) या खास पेयाशिवाय हा सण अपूर्ण असल्याचे म्हटले जाते. 


भांग हे पेय विविध मिश्रणातून बनवले जाते. होळीच्या सणात भांग हा सणाचा एक आवश्यक भाग म्हणून पारंपारिकपणे वापरला जातो. उत्साहाच्या भरात अनेक जण भांग अतिप्रमाणात पितात. भांगेच्या ओव्हरडोसमुळे तुम्हाला अस्वस्थता, उलट्या, थकवा आदी लक्षणे जाणवू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही होळीच्या दुसऱ्या दिवशी हँगओव्हर (Hangover) वाटत असेल तर या टिप्सने तुम्ही भांगेचा ओव्हर डोस कमी करू शकता. 


हर्बल चहा प्या


हर्बल चहा प्यायल्याने तुमचे शरीर डिटॉक्स होते. हे सर्व विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करेल. त्यामुळे तुमचा हँगओव्हर कमी होण्यास मदत होते. ग्रीन टी किंवा कोणत्याही हर्बल चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कॅनॅबिस हँगओव्हरला प्रभावीपणे हाताळण्यास मदत करतात.


लिंबू पाणी प्या


लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. हँगओव्हर कमी करण्यासाठी याचा वापर होतो. भांगेचा हँगओव्हर कमी करण्यासाठी आवश्यक असणारा अँटीऑक्सिडेंट गुण असतात. लिंबू पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर हायड्रेटेड आणि फ्रेश राहाल. यामुळे मळमळ आणि थकवा कमी होण्यास मदत होईल.


पाणी पित राहा


भांगेचे सेवन केल्यानंतर तहान लागते. बर्‍याचदा, भांगेचे सेवन केल्यानंतर प्रचंड भूक लागते आणि अतिप्रमाणात खाणं होतं. मात्र, त्या प्रमाणात पाणी कमी पितात. भांगेमुळे डिहायड्रेशन होऊ शकते. शरीरात पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी, भरपूर पाणी प्या. मळमळ कमी होण्यासाठी तुम्ही अननसाचा रस, सफरचंदाचा रस आणि संत्र्याचा रस पाण्यासह घेऊ शकता. 


पुरेशी झोप महत्वाची


भांगेचे सेवन केल्यानंतर डोक काम करत नसेल तर पार्टी सोडून कुठेतरी आरामात झोपण्याची हीच योग्य वेळ आहे, असे समजा. तीव्र डोकेदुखीसाठी झोप हा सर्वोत्तम उपचार आहे.


गरम पाण्याने आंघोळ करा


गरम पाण्याने आंघोळ करणे हा कोणताही हँगओव्हर बरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. याने तुम्हाला एक नवी ऊर्जा मिळेल आणि भांगाची नशाही कमी होईल. मात्र, हे उपाय करूनही तुमचा हँगओव्हर कमी होत नसेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि घाबरू नका.