Diabetes Health Tips : मधुमेह (Diabetes) हा आजार अत्‍यंत सामान्‍य आहे. भारतात अनेकजण या आजाराने त्रस्त आहेत. भारतात जवळपास 77 दशलक्ष व्‍यक्‍ती या आजाराने त्रस्त आहेत. तर, जवळपास 57 टक्‍के प्रौढ व्‍यक्‍तींचे मधुमेहाबाबत निदान झालेले नाही. याचं कारण हा आजार डोळ्यांना दिसत नाही तर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे तो जाणवतो. मात्र, अनेकांना या आजाराची लक्षणंच माहित नसतात. या आजाराबाबत अनेक गैरसमज देखील आहेत. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


या संदर्भात माहिती देताना मुंबईतील शिल्‍पा मेडिकल रिसर्च सेंटरचे कन्‍सल्‍टन्ट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्‍ट आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्‍स इंडियाचे सेक्रेटरी-जनरल डॉ. मंगेश तिवस्‍कर म्‍हणाले, ‘‘भारतातील मधुमेही व्‍यक्‍तींपैकी जवळ-जवळ तीन चतुर्थांश व्‍यक्‍तींमध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण अनियंत्रित आहे आणि त्यापैकी निम्म्या व्‍यक्‍तीमध्ये रक्तदाब नियंत्रण कमी आहे. तसेच त्यांच्यापैकी किमान एक तृतीयांश व्‍यक्‍तींमध्‍ये कोलेस्ट्रॉल आणि लिपिड वाढले आहे. या चयापचय विकृतींच्‍या सामान्य कारणांमध्‍ये उपचारांचे पालन न करणे, डॉक्टरांना वारंवार भेट न देणे आणि अयोग्‍य व्यवस्थापित मधुमेहाच्या दीर्घकालीन परिणामांबद्दल जागरूकतेचा अभाव यांचा समावेश आहे.’’


मधुमेहाबाबत 'हे' 5 गैरसमज आहेत


1. गोड पदार्थांच्या सेवनाने मधुमेह होतो 


सर्वप्रथम म्हणजे, मधुमेह हा विविध घटकांशी संबंधित असा जटिल आजार आहे.  यामध्ये अनेक लक्षणं दिसून येतात. जसे की, वजन वाढणे, लठ्ठपणा जाणवणे, बैठेकाम करण्‍याची जीवनशैली इ. विविध कारणांमुळे मधुमेह होऊ शकतो. तसेच, जर तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह असेल तर आनुवंशिक कारणाने देखील मधुमेह होऊ शकतो. त्यामुळे फक्त गोड पदार्थांच्या सेवनानेच मधुमेह होतो हा गैरसमज चुकीचा आहे. मात्र, तरीही गोड पदार्थांचं सेवन कमी करावं. कारण उच्‍च प्रमाण असलेल्‍या आहारामधून कॅलरींचे प्रमाण वाढते, ज्‍यामुळे वजन वाढू शकते आणि परिणामत: मधुमेह होण्‍याचा धोका वाढू शकतो. 


2. मधुमेह बरा होऊ शकतो


काही फार कमी केसेस आहेत ज्यामध्ये मधुमेह बरा होऊ शकतो. मात्र, बहुतांश केसेसमध्ये मधुमेह झाल्यास तो आजीवन (Lifetime) होतो. मात्र, मधुमेह झाल्यास घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही अनेक मार्गांनी यावर नियंत्रण मिळवू शकता. योग्य आहार, व्यायाम आणि योग्य उपचार केल्यास तुम्ही या आजारावर नियंत्रण मिळवू शकता. 


3. मधुमेहाचा फक्‍त शरीराच्‍या रक्‍तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो


मधुमेह हा गंभीर आजार आहे, ज्‍याचा शरीर रक्‍तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की,  हा आजार अनियंत्रित असल्‍यामुळे इतर संबंधित जटिलता निर्माण होऊ शकतात, जसे हृदय, डोळा, मूत्रपिंड, रक्‍तवाहिन्‍या किंवा पायाशी संबंधित समस्‍यांचा धोका वाढू शकतो. यामुळे मधुमेहाचे वेळेवर व्‍यवस्‍थापन करणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी रूग्णांनी वेळोवेळी आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.   


4. मधुमेहाचे काही प्रकार घातक नसतात


मधुमेह टाइप 1, टाइप 2 आणि गेस्‍टेशनल (गरोदर असताना) असा विविध प्रकारचा असला तरी त्‍यांना सौम्‍य किंवा गंभीर अशी विभागणी करता येत नाही. तुम्ही जर मधुमेहावर वेळीच उपचार घेतले नाहीत तर त्याचे परिणाम दीर्घकालीन होऊ शकतात.  


5. आहार आणि जीवनशैली बदलांसह मधुमेहाचे पूर्णपणे व्‍यवस्‍थापन करता येऊ शकते


रक्‍तातील शर्करेचे प्रमाण वाढवणाऱ्या विशिष्‍ट खाद्यपदार्थांचे कमी प्रमाणात सेवन आणि आरोग्‍यदायी फिटनेस नित्‍यक्रमाचा अवलंब मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी महत्त्वाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की, फक्‍त इतकेच उपाय मधुमेहाने पीडित व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या आजाराचे संपूर्ण व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी पुरेसे आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


Brains Waste : शास्त्रज्ञांनी उलगडलं नवं रहस्य; मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावणारी रचना, काय आहे खास?