Gestational Diabetes : रक्तातील उच्च ग्लुकोज पातळी ज्याला रक्त शर्करा म्हणून ओळखले जाते हे गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात गर्भातील बाळाचे नुकसान करु शकते. मधुमेह (Diabetes) असलेल्या मातांनी त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शक्य तितक्या लवकर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मधुमेहाचा तुमच्या बाळावर कसा परिणाम होतो?
गरोदरपणाच्या (Pregnancy) पहिल्या आठ आठवड्यात बाळाचा मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांसह अवयव विकसित होऊ लागतात. या सुरुवातीच्या काळात रक्तातील उच्च साखरेची पातळी धोकादायक ठरु शकते. तुमच्या बाळाला जन्मजात समस्यांसह हृदय दोष किंवा मेंदू किंवा मणक्यातील दोषांसह जन्माला येण्याचा धोका वाढवते.
याव्यतिरिक्त, गरोदरपणात रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्याने तुमच्या बाळाची अकाली प्रसुती होण्याची शक्यता वाढू शकते, खूप जास्त वजन वाढू शकते, श्वसनाचा त्रास होऊ शकतो किंवा जन्मानंतर लगेचच रक्तातील साखरेची पातळी कमी असण्याची शक्यता असते. रक्तातील उच्च साखरेमुळे तुमचा गर्भपात होण्याची किंवा मृत बाळ जन्म येण्याची शक्यता अधिक असते. "स्टिलबॉर्न" (Stillborn) हा शब्द गर्भावस्थेच्या दुसऱ्या भागात (Second Trimester) गर्भातच मृत पावणाऱ्या बाळासाठी वापरला जातो.
मधुमेहाचा आईवर कसा परिणाम होतो?
तुमच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर तुमच्या शरीरातील हार्मोनल आणि चयापचय बदलांमुळे परिणाम होतो जे गर्भधारणेदरम्यान होतात. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या मधुमेहाचे काटेकोरपणे व्यवस्थापन करावे लागेल. तुम्हाला बराच काळ मधुमेह झाला असला तरीही, तुम्हाला तुमचा आहार, व्यायामाची पथ्ये आणि औषधे समायोजित करावी लागतील. जर तुम्ही तोंडावाटे मधुमेहाचे औषध घेत असाल तर तुम्हाला इन्सुलिनचा वापराची आवश्यकता भासू शकते.
गर्भधारणेमुळे मधुमेहाची काही दीर्घकालीन गुंतागुंत होऊ शकते, विशेषतः जर तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप जास्त असेल. जसे की डोळ्यांच्या समस्या आणि मूत्रपिंडाचे आजार.
याव्यतिरिक्त, तुम्हाला प्रीक्लॅम्पसिया होण्याची शक्यता असते, ज्याला टॉक्सेमिया देखील म्हणतात, जो गर्भधारणेच्या दुसऱ्या टप्प्यात उच्च रक्तदाब आणि मूत्रात जास्त प्रमाणात प्रथिने म्हणून प्रकट होतो. प्रीक्लॅम्पसिया तुम्हाला किंवा तुमच्या न जन्मलेल्या बाळाला गंभीरपणे इजा करु शकते. एकदा रुग्णाची प्रसुती झाली की, प्रीक्लॅम्पसिया बरा होतो. तुम्हाला प्रीक्लॅम्पसिया असल्यास किंवा 36/37 आठवड्यांत तुमची प्रसुती होण्याची शक्यता असल्यास तुमचे डॉक्टर लवकर प्रसुतीचा सल्ला देऊ शकतात. जन्मापूर्वी तुमच्या बाळाचा शक्य तितका विकास होण्यासाठी तुम्ही आणि तुमचे डॉक्टर 37 आठवड्यांपूर्वी इतर पर्याय वापरु शकतात.
निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी तुमच्या गर्भधारणेदरम्यान तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी शक्य तितक्या सामान्य पातळीवर ठेवणे महत्त्वाचे आहे. गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान नियमित तपासणी करुन तुम्ही तुमचा मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करु शकता. तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केल्यानुसार मधुमेहावरील औषधे तसेच संतुलित आहार घेणे योग्य राहील. धूम्रपान टाळणे आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जीवनसत्त्वे घेणे तुम्हाला आणि तुमच्या न जन्मलेल्या बाळास निरोगी राहण्यास मदत करु शकते.
- डॉ. पायल नारंग, सल्लागार प्रसुती आणि स्त्रीरोग तज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.