Heatwave: जोपर्यंत ते घरात आहोत, तोपर्यंत काहीच वाटत नाही, पण घराबाहेर पडलं की, जीवघेणी गरमी अगदी वितळवून टाकते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वातावरणात वाढणारी तीव्र उष्णता अगदी हैराण करुन टाकते. डिहायड्रेशन, थकवा आणि उष्माघात सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय ठरत आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी घरीच राहणं आणि शक्य तेवढं घराबाहेर टाळावं, असा सल्ला वारंवार दिला जात आहे. या रणरणत्या उन्हापासून वाचण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अलिकडेच आरोग्य मंत्रालयानं उष्णतेच्या लाटेपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काही आरोग्यमंत्र दिले आहेत. ज्यांचं पालन करून तुम्ही या उष्णतेवर मात करू शकता आणि शरीराची काळजी घेऊ शकता. 


आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या माहितीनुसार, Heatwave पासून बचाव करायचा असेल, तर त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनातून काही गोष्टी तूर्तासतरी पूर्णपणे काढून टाकाव्या लागतील. सरकारनं लोकांना दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेय टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यामुळे शरीरातील अधिक द्रवपदार्थांचे नुकसान होऊ शकतं. तसेच, हाय-प्रोटीन फूड आणि शिळे अन्नपदार्थ न खाण्याचा सल्ला मंत्रालयानं दिला आहे.


जर हीटवेवपासून रक्षण करायचं असेल, तर तुम्हाला दररोज मुबलक पाणी पिणं गरजेचं आहे. कारण वातावरणातील उष्णता वाढल्यानंतर शरीर हायड्रेटेड ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. डिहाइड्रेशनमुळे अशक्तपणा, थकवा आणि इतरही आजार जडण्याचा धोका असतो. 


वातावरणातील उष्णता लक्षात घेता, ज्या पदार्थांचा आहारात समावेश कराल, तो विचारपूर्वक कराल, असंदेखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. 



  • Heatwave दरम्यान, तासन्तास किचनमध्ये जेवण बनवणं टाळा. 

  • जेवण बनवत असताना घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडा. 

  • मद्यपान, चहा-कॉफीचं सेवन टाळा. कोल्ड ड्रिंक पिणंही टाळा. 

  • हाय प्रोटीन फूड खाणं टाळा. 

  • उबदार कपडे घालणं टाळा, त्याऐवजी हलके आणि सुती कपडे घाला. 

  • स्वतःला हाड्रेट ठेवण्यासाठी मुबलक पाणी प्या.