Reels Addiction: टीव्हीवर चित्रपट पाहणे, सीरियल पाहणे आणि रेडिओवर गाणी ऐकणे...या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झाल्यात की काय असे चित्र दिसू लागले आहे. सध्या करमणुकीसाठी रील्स पाहण्याकडे अनेकांचा ओढा वाढू लागला आहे. लहान मुलांपासून ते तरुण, वयोवृद्धदेखील रील्स पाहण्यात व्यस्त आहेत. झोपताना-जागताना, खात-पिण्यात, प्रवासात, सगळीकडे रिल्सचा हँगओव्हर असतो. Instagram आणि YouTube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रोल करत तुमचा बराच वेळही निघून जातो. पण रील्सचा मोह सुटत नाही. रील्स पाहण्याचे व्यसन लागणे हा आता एक प्रकारचा आजार झाला आहे.
रील्स म्हणजे काय?
रील्स हा इन्स्टाग्रामवरील लहान व्हिडिओचा एक प्रकार आहे. सुरुवातीला हे रील्स 30 सेकंदांच्या कालावधीचे असायचे पण आता ते 90 सेकंदांपर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतात टिकटॉक बंद झाल्यावर या रील्सचा ट्रेंड सुरू झाला.
लोकांनी Instagram वर व्हिडिओ पोस्ट करणे सुरू केले. रील्समध्ये अनेक प्रकारच्या व्हिडीओचा समावेश होतो. यामध्ये माहितीपूर्ण, मजेदार, प्रेरणादायी, डान्स आदी विविध प्रकारचा कंटेट या रील्समध्ये असतो. इन्स्टाग्रामवर सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोक हे रील्स पाहतात.
रील्स पाहिल्यामुळे गंभीर परिणाम?
रील्समुळे मोठ्या प्रमाणावर वेळेचा अपव्यय होत आहे. व्हीडिओ पाहण्यात किती तास उलटतात हे लक्षात येत नाही. अशा स्थितीत त्यांचे कामाकडे दुर्लक्ष होत आहे. रील्सच्या व्यवसनामुळे लोक मानसिक आजारी पडत आहेत. लोकांमध्ये डिप्रेशनची समस्या दिसून येत आहे. पुष्कळ वेळा रील्स पाहिल्याने अनेकजण स्वतःतील दोष शोधू लागतात. समोरच्या व्यक्तीशी स्वतःची तुलना सुरू करतात. त्यातून समोरच्या व्यक्तीसारखे बनण्याचा प्रयत्न करू लागतात. याच्या परिणामी एक न्यूनगंड तयार होतो. जेव्हा त्यांचे रील्स व्हायरल होत नाहीत किंवा व्ह्यूज मिळत नाहीत तेव्हा त्यांना राग आणि चिडचिड वाटू लागते आणि हळूहळू या तणावाचे नैराश्यात रूपांतर होते. त्यामुळे एकाग्रतेच्या अभावामुळे एकटेपणाची भावना येते.
लहान मुले रील्स पाहत असतील तर त्यामुळे त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होते. रील्सच्या व्यसनामुळे मुले अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. रात्री उशिरापर्यंत रिल्स पाहिल्याने झोप कमी होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यास त्रास होतो. झोप कमी झाल्यामुळे तणाव सुरू होतो. त्याचबरोबर स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळे कमकुवत होतात, याशिवाय रील्समुळे शारीरिक हालचालीदेखील कमी होतात. त्यातून लठ्ठपणासारखा आजार होऊ शकतो.