Health : मान्सून येताच विविध आजारांनी डोकं वर काढलंय, ज्यामुळे लोकांची चिंता आणखीनच वाढलीय. खरं तर एप्रिल-मे महिन्यात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं, अशात लोक पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण पावसाळ्यात प्रखर उन्हापासून आराम मिळतोच, सोबत वातावरणही आल्हाददायक होते. पण त्याचबरोबर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. अलीकडे राज्यासह मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. पावसाळ्यात फ्लूचे रुग्ण का वाढतात? ते कसे टाळता येईल? हे जाणून घेऊया.


 


पावसामुळे व्हायरल ताप, डेंग्यू, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असून यासोबतच देशाच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. कडक उन्हापासून दिलासा देणारा मान्सून केवळ आल्हाददायकच नाही तर अनेक आजारही घेऊन येतो. सध्या मुंबईत विषाणूजन्य फ्लू, विशेषतः डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती समोर येतेय. या ऋतूत अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या काळात निरोगी राहण्यासाठी स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही आजारी न पडता पावसाळ्याच्या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटायचा असेल तर काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.  पावसाळ्यात फ्लूचे रुग्ण वाढण्याची कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत, आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या..


 


पावसाळ्यात फ्लूचे रुग्ण वाढण्याचे कारण काय?


अनेक कारणांमुळे पावसाळ्यात फ्लूचे रुग्ण वाढतात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुख्य कारणांमध्ये या ऋतूत वाढलेली आर्द्रता आणि थंड तापमान यांचा समावेश असतो, जे इन्फ्लूएंझा विषाणूंच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी एक पोषक वातावरण तयार करतात. या व्यतिरिक्त, या काळात लोक घरामध्ये एकमेकांच्या जवळ जास्त वेळ घालवतात, ज्यामुळे व्हायरसचा प्रसार सुलभ होतो.


 


फ्लूची सामान्य लक्षणे


खोकला
डोकेदुखी
उच्च ताप
थंडी जाणवणे
शरीर वेदना
घसा खवखवणे
मळमळ आणि उलटी
खूप थकवा
वाहणारे किंवा भरलेले नाक



फ्लू टाळण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा-


फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेची काळजी घेणे.
विशेषत: खोकल्यावर किंवा शिंकल्यानंतर नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुवा, .
साबण उपलब्ध नसल्यास, हँड सॅनिटायझर देखील वापरता येईल.
चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा, विशेषत: डोळे, नाक आणि तोंड, कारण हे विषाणूसाठी प्रवेश बिंदू आहेत.
दरवाजाचे हँडल, लाईट स्विचेस आणि मोबाईल फोन यांसारख्या वारंवार स्पर्श केलेल्या वस्तूंची स्वच्छता करत रहा.
याशिवाय, फ्लूची प्रकरणे टाळण्यासाठी, वार्षिक फ्लूची लस करून घ्या.


 


 


हेही वाचा>>>


Health : झिका व्हायरसचा वाढतोय प्रसार, 'ही' रोपं म्हणजे डासांपासून सुरक्षा करणारे रक्षकच जणू! आजच लावा..


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )