Health : सध्या देशासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशातच लोकसभा निवडणूक असल्याने या तापत्या उन्हात बाहेर पडावे लागत आहे. एकीकडे गरज असल्यासच घराबाहेर पडा असा इशारा आरोग्य तज्ज्ञ तसेच हवामान विभागाने दिलाय, तर दुसरीकडे कामानिमित्त तसेच मतदान करण्यासाठी मतदारराजाला घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. या कडक उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक असते. वाढत्या तापमानात अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्याही आपल्याला सतावू लागतात. प्रचंड उष्णतेमुळे लोक खाली पडून बेशुद्ध झाल्याच्या बातम्या येत आहेत. याचं नेमकं कारण, तसेच उष्णतेची लाट टाळण्यासाठी नेमकं काय करायचं हे जाणून घ्या.
..ज्यामुळे उन्हाळ्यात लोक बेशुद्ध होत आहेत
तुम्हीही तुमच्या आजूबाजूला अशा गोष्टी अनेकदा पाहिल्या असतील. जास्त वेळ उन्हात राहणे, पुरेशा प्रमाणात पाणी न मिळणे आणि बीपी कमी होणे अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे उन्हाळ्यात लोक बेशुद्ध होत आहेत. कडाक्याच्या उन्हात चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे, भोवळ येण्यासारख्या समस्या समोर येत आहेत. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. कडक उन्हात लोक बेशुद्धही होतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट टाळण्यासाठी, या सोप्या टिप्स तुम्हाला मदत करतील.आहारतज्ज्ञ नंदिनी याबाबत माहिती देत आहेत.
हे उपाय उष्णतेची लाट टाळण्यास मदत करतील
भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या आपल्याला सतावतात.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा. तुमच्या आहारात पाणी, नारळपाणी, पाणीयुक्त पदार्थ आणि ज्यूस यांचा समावेश जरूर करा.
चहा-कॉफी कमी प्या. यामुळे तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता. चहा किंवा कॉफी पिण्याच्या एक तास आधी पाणी पिण्याची खात्री करा.
बाहेर जाताना डोके आणि चेहरा व्यवस्थित झाका.
दुपारी 12-3 च्या दरम्यान शक्य तितक्या कमी बाहेर जाण्याचा प्रयत्न करा.
लिंबू आणि मीठ असलेले पाणी देखील कमी रक्तदाबापासून बचाव करण्यास मदत करते.
प्रथिने युक्त नाश्ता करा. काही खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
जर तुम्हाला लो बीपीची समस्या असेल तर स्वतःची विशेष काळजी घ्या.
स्ट्रॉबेरी, संत्री, काकडी आणि टरबूज यांचा आहारात समावेश जरूर करा.
ताक पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
यासोबतच हलके अन्न खा, जे शरीराला पचायला सोपे जाते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Women Health : 'आजकाल खूपचं चिडचिड होतेय गं..' PCOS मुळे महिलांचे फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही बिघडते? लक्षणं जाणून घ्या, डॉक्टर सांगतात..