Health: कर्करोग म्हणजेच कॅन्सरचे नाव काढताच, भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कारण हा जगातील सर्वात धोकादायक आणि प्राणघातक आजारांपैकी एक आहे, केवळ भारतच नव्हे, जगभरातील अनेक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. या आजाराबाबत वैद्यकीय शास्त्र विविध प्रकारचे संशोधन करत असते, अशाच एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, कर्करोग रोखण्यासाठी उपवास प्रभावी ठरू शकतो. विविध धर्माचे लोक आपापल्या नियमानुसार धर्माचे पालन करतात, त्यानुसार उपवास करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? उपवास हा केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नसून आरोग्यासाठीही तितकाच चांगला आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, उपवासामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. नेमकं सत्य काय?


संशोधनामुळे उपचारांच्या नवीन पद्धतींचा खुलासा


कॅन्सरचे नाव ऐकताच लोकांच्या मनात एक भीती निर्माण होते, आज जरी कॅन्सरवर उपचार करणे शक्य झाले असले तरी त्याचा उपचार ही एक मोठी आणि किचकट प्रक्रिया आहे, ज्यामुळे रुग्ण या आजाराशी लढण्याची क्षमता गमावू लागतो. या क्षेत्रातील संशोधनामुळे उपचारांच्या नवीन पद्धतींचा खुलासा होत आहे, ज्यामुळे या आजारापासून लोकांचे प्राण वाचू शकतात. अशाच एका संशोधनात कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी एक रणनीती सुचवण्यात आली आहे, यावर जलद परिणाम मिळविण्याचा मार्ग म्हणजे उपवास.


नवीन अभ्यास काय म्हणतो?


उपवासामुळे कर्करोगाच्या पेशींवर कसा परिणाम होतो हे या वैद्यकीय अभ्यासात आढळून आले आहे. उंदरांवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, उपवासामुळे कर्करोगाविरूद्ध शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली मजबूत होते. हा रोगप्रतिकारक शक्तीचा एक महत्त्वाचा घटक आहे जो कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी कार्य करतो.


उपवास करण्याचे परिणाम काय? 


जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या दुसऱ्या अभ्यासात यकृताच्या आरोग्यावर आणि कर्करोगाच्या जोखमीवर अधूनमधून उपवास करण्याचे परिणाम शोधले गेले आणि उंदरांवरील त्यांच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की अधूनमधून उपवास म्हणजेच पाच दिवस नियमित खाणे आणि त्यानंतर दोन दिवस अन्नाचे सेवन मर्यादित करणे यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून आले. यामुळे फॅटी लिव्हर, यकृताचा दाह आणि कर्करोग होण्याचा धोका कमी झाला, असे एका संशोधनातून आढळले.


कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपवास करणे आशादायक 


काही माध्यमांच्या अहवालांनुसार, डॉक्टरांचा असा विश्वास आहे की कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपवास हे आशादायक असू शकते की नाही हे पूर्णपणे इन्सुलिनच्या पातळीच्या सेल्युलर प्रक्रियेवर होणाऱ्या संभाव्य परिणामावर अवलंबून असते. उच्च इन्सुलिन पातळीमुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ होते. उपवासामुळे इन्सुलिनची पातळी कमी होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.


उपवास केल्याने कोणते फायदे होतील?



  • तज्ज्ञांच्या मते, उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स वाढतात. 

  • हे कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही. 

  • मात्र, हे सर्व रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल की नाही यावर कोणतेही संशोधन झालेले नाही. 

  • कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे

  • त्याला उशीर करणे घातक ठरू शकते 

  • त्यामुळे उपवास करणे कठीण होऊ शकते. 

  • जर एखाद्या रुग्णाला हे करायचे असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 


हेही वाचा>>>


Health: आश्चर्यच... उंच लोकांना कर्करोग लवकर होतो? नेमकं सत्य काय? वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडचा रिपोर्ट सांगतो...


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )