Health: सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारठा वाढत चालल्याचं देखील निदर्शनास आले आहे. हिवाळ्यात थंडी वाढत असल्यामुळे याचा त्रास अनेक रुग्णांना होतो, विशेषत: कर्करोगाचे रुग्ण आहेत, त्यांना या वाढत्या थंडीचा अधिक त्रास जाणवू लागला आहे. कर्करोगाचे रुग्णांनी केलेल्या तक्रारीनुसार हिवाळ्यात त्यांच्या वेदना तीव्र किंवा अधिक स्थिर होतात. केमोथेरपी किंवा रेडिएशन घेत असलेल्या लोकांमध्ये अनेकदा नसा संवेदनशील होतात, म्हणून तापमानात घट झाल्यास त्यांना अस्वस्थता किंवा वेदना जाणवू शकतात. टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटर येथील ऑन्कोलॉजिस्ट, डॉ. उत्कर्ष आजगावकर यांच्या माहितीनुसार, कर्करोगाच्या रुग्णांनी केलेल्या तक्रारीनुसार हिवाळ्यात त्यांच्या वेदना तीव्र किंवा अधिक स्थिर होतात. यामागची कारणं जाणून घ्या..
हिवाळ्यात कॅन्सरची वेदना जास्त जाणवतात, तज्ज्ञांनी सांगितली यामागची कारणं
डॉ. उत्कर्ष आजगावकर सांगतात, हिवाळ्यातील थंड तापमान, स्नायूंचा कडकपणा, सूर्यप्रकाशाची कमतरता आणि रक्तप्रवाह मंदावल्यामुळे हिवाळ्यात कर्करोगाशी संबंधित वेदना अधिक तीव्र होतात. तापमान घसरल्यावर शरीरातील रक्तप्रवाह, स्नायूंची लवचिकता आणि नसांमधील संवेदनशीलतेत बदल होतात ज्याचा थेट परिणाम वेदनांवर होतो.थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे स्नायू आणि ऊतींना रक्तपुरवठा कमी होतो, ज्यामुळे वेदना होतात. थंड तापमानामुळे स्नायु कडक होतात आणि वेदना वाढतात आणि कधीकधी गति हीनता देखील वाढू शकते. हिवाळ्यात केमोथेरपीमुळे न्यूरोपॅथीची समस्या जाणवते. न्यूरोपॅथी (Neuropathy) म्हणजे मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे शरीराच्या एका किंवा अधिक भागांमध्ये होणारी वेदना, सुन्नपणा (बधीरपणा), मुंग्या येणे किंवा अशक्तपणा ही एक स्थिती आहे, जी मधुमेहासारख्या अनेक कारणांमुळे होऊ शकते आणि पायांमध्ये जास्त आढळते. काही कर्करोगाच्या रुग्णांना पायांमध्ये जळजळ, मुंग्या येणे आणि बधीरपणा जाणवू शकतो, जे चिंताजनक असू शकते आणि त्यांना वेळीच लक्ष देण्याची गरज भासू शकते. फ्लू किंवा सर्दी सारख्या हिवाळ्यातील संसर्गामुळे शरीरावर ताण येऊ शकतो, जळजळ वाढते आणि कर्करोगाच्या वेदना आणखी तीव्र होतात. कर्करोगाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि उपचार करणाऱ्या तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे.
हिवाळ्यात कर्करोगाच्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सांधे कडक होणे आणि सांध्यामधील वेदना टाळण्यासाठी कर्करोगाच्या रुग्णांनी त्यांचे शरीर उबदार ठेवणे आणि संपुर्ण शरीर झाकणारे कपडे घालणे गरजेचे आहे. स्नायुंचा कडकपणा दूर करण्यासाठी उबदार कॉम्प्रेस किंवा हीटिंग पॅडचा पर्याय निवडा. घरच्या घरी स्ट्रेचिंग करा किंवा चालण्याचा व्यायाम करा जे रक्ताभिसरण सुधारण्यास फायदेशीर ठरेल. थकवा आणि वेदना व्यवस्थापित करण्यासाठी पुरेशी झोप घ्या. तीव्र सांधेदुखी आणि स्नायुंचा कडकपणा दूर करण्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. थंडीच्या महिन्यांत कर्करोगाच्या रुग्णांनी सतर्क रहा आणि स्वतःची विशेष काळजी घ्या.
हेही वाचा :
रक्तातील साखर वाढली की डोळ्यांवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)