Eye Health Blood Sugar: विकसित आणि विकसनशील देशांमध्ये मधुमेह हा आजार एका महासाथीचे रूप धारण करत आहे. टाइप 2 मधुमेह केवळ वृद्धांमध्ये नव्हे तर तरुण आणि मध्यमवयीन व्यक्तींमध्येही वेगाने वाढत आहे. वेगवान आयुष्यामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, निद्रानाश, खानपानातील चुकीच्या सवयी आणि बिंज-ईटिंगमुळे इन्सुलिनला अवरोध निर्माण होतो आणि परिणामी टाइप 2 मधुमेह उद्भवतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने शरीरातील लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे हृदय, मूत्रपिंड आणि डोळ्यांतील रेटिनावरही त्याचा मोठा परिणाम दिसतो. पुण्यातील पिंपरी चिंचवडचे डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलच्या कन्सल्टंट ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. सोनल एरोले यांनी रक्तातील साखरेचा आणि डोळ्यांच्या आरोग्याच्या संबंधाविषयी मार्गदर्शन केले आहे.
मधुमेहाचा डोळ्यांच्या आरोग्याशी काय संबंध?
डोळ्यात साखरेचे प्रमाण वाढल्यास चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, सामान्य व्यक्तींपेक्षा लवकर मोतिबिंदू होणे, ग्लाउकोमाची शक्यता वाढणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डायबेटिक रेटिनोपथी होण्याची शक्यता निर्माण होते. या आजारात सुरुवातीला रेटिनावर लहान रक्ताचे डाग दिसतात.
साखरेवर नियंत्रण न ठेवल्यास या डागांची संख्या व आकार वाढतो. रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर येऊन रेटिनाच्या मध्यभागी (मॅक्युला) जमा होते. यामुळे डायबेटिक मॅक्युलर एडेमा होतो आणि दृष्टी कमी होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर रेटिनावर नवीन रक्तवाहिन्या वाढतात, ज्याला निओव्हॅस्क्युलरायझेशन म्हणतात. या रक्तवाहिन्या कमकुवत असल्याने स्वतःहून किंवा धक्का लागल्यास फुटू शकतात आणि व्हिट्रस हॅमोरेज होऊन दृष्टीवर गंभीर परिणाम होतो.
प्रतिबंध आणि उपचार
यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे. डायबेटिक रेटिनोपथीची सुरुवात आणि वाढ हे मुख्यत्वे 2 गोष्टींवर अवलंबून असते.
1) तुम्हाला किती काळापासून मधुमेह आहे?
2) तुमच्या रक्तातील साखरेच्या चढ-उताराचे प्रमाण काय आहे?
यापैकी, साखरेचा चढ-उतार तुमच्या हाती आहे. साखरेवरील नियंत्रण जितके काटेकोर असेल तेवढी तुमच्या रेटिनाचे आरोग्य चांगले राहील.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर वर्षी तुम्ही रेटिनाची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही नियमितपणे रेटिनाची तपासणी करत असाल तर डायबेटिक रेटिनोपथीमुळे होणारे बदल सुरुवातीच्या टप्प्यातच समजतील आणि लेझर किंवा इंट्राव्हिट्रिअल इंजेक्शनसारखे सुयोग्य उपचार करून दृष्टीला होणार नुकसान टाळता येऊ शकेल. डायबेटिक रेटिनोपथी हा आजार पुढच्या टप्प्यात पोहोचतो तसतसे रेटिनाची तपासणी वारंवार आणि अधिक काटेकोरपणे करावी लागते आणि आवश्यक उपचार घेणे हे उद्दिष्ट होते. व्हिट्रेअस हॅमरेजसारख्या रक्तस्त्रावासाठी, जर रक्त लवकर निघून गेले नाही तर व्हिट्रेक्टॉमीसारख्या रेटिनाच्या शस्त्रक्रियांची गरज भासू शकते. त्यामुळे सर्व मधुमेहींनी वर्षातून एकदा रेटिनाची तपासणी करून घ्यावी आणि रक्तातील साखरेवर शक्य तेवढे नियंत्रण ठेवावे.