Employee Health: डिजिटल युगात बरेच जण घरून (रिमोट वर्क) काम करतात. घरून कामाचे फायदे बरेच आहेत, जसे की ऑफिसला जाण्यासाठीचा वेळ वाचतो, प्रवास करावा लागत नाही, घराजवळ राहून काम करता येते. असे असले तरी त्याचे मानसिक आरोग्यावरही काही नकारात्मक परिणाम होतात, यालाच डिजिटल बर्नआउट असेही म्हणतात. पॉश ॲण्ड एएमएल एक्सपोर्टचे लीडरशिप कोच, कॉर्पोरेट ट्रेनर कृती शर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिलीय, जाणून घ्या सविस्तर...
डिजिटल युगात कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम
कृती शर्मा सांगतात, रिमोट वर्कमुळे लोक घरून काम करू शकतात, पण याचसोबत बराच वेळ स्क्रीनसमोर बसणे, सतत नोटिफिकेशन्स येणे , काम आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन साधता न येणे व त्यामुळे मानसिक थकवा जाणवू लागला आहे.
डिजिटल बर्नआउट का वाढतोय? सतत ऑनलाइन राहण्याचा ताण
ईमेल, मेसेजेस, मीटिंग्स यामुळे लोकांना नेहमी कामात असल्यासारखे वाटते.यामुळे तणाव, चिंता आणि झोपेच्या समस्या वाढतात. घर आणि ऑफिस एकच होणे घरून काम करताना लोकांना ब्रेक घेताना किंवा काम बंद करताना अपराधीपणाची भावना येते. यामुळे मानसिक थकवा येतो. वाढता स्क्रीन टाइम सतत ऑनलाइन मीटिंग्स, वाढता लॅपटॉप आणि मोबाइलचा वापर यामुळे डोळ्यांना त्रास, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होते. याला स्क्रीन फटीग म्हणजेच स्क्रिनमुळे येणारा थकवा म्हणतात. सामाजिकदृष्ट्या संपर्क कमी होणे ऑफिसमध्ये होणाऱ्या गप्पा, टीमसोबत घालवलेला वेळ, एकमेकांसोबत मिळून केलेले काम यामुळे एकटेपणा आणि निराशा वाढू शकते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी येणारे दडपण लोकांना वाटते की त्यांनी नेहमी व्यस्त दिसले पाहिजे.यामुळे जास्त काम, मल्टिटास्किंग आणि शेवटी बर्नआउट होते.
या समस्यांना कसे हाताळाल?
- नियम तयार करा की कामाचे तास उलटल्यावर मेसेज नको
- ठरलेल्या वेळांमध्येच मिटींग करणे, कामाचे तास संपल्यानंतर ईमेल्स करु नये, त्यांना प्रतिसाद देऊ नये असे नियम स्वतःसाठी लागू करा.
- अधून मधून ब्रेक घ्या
- दर तासाला छोटासा ब्रेक घ्या, एका जागी न बसता केलेली मीटिंग किंवा काही वेळ स्क्रीन बंद ठेवणे फायदेशीर ठरेल.
- मानसिक आरोग्याला प्राधान्य
- कामाचा ताण, मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोला आणि सहकाऱ्यांशी चर्चा करा.
- काम–घर यांचा समतोल राखा
- कुटुंबासाठी वेळ काढा, मानसिक आरोग्याशी संबंधीत उपक्रमांमध्ये सहभागी व्हा, समुपदेशनाची मदत घ्या आणि तणावमुक्त राहायला शिका.
- कामाचे कौतुक करा
- कर्मचाऱ्यांचे कौतुक केल्याने त्यांचे मनोबल वाढते. कामाचे कौतुक केल्यास त्यांना अधिक प्रोत्साहन मिळते आणि तणाव कमी होतो.
हेही वाचा :
रक्तातील साखर वाढली की डोळ्यांवर कसा परिणाम होतो? डॉक्टरांनी सांगितले गंभीर परिणाम
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)