Diwali 2023 : दिवाळी (Diwali 2023) हा आनंदाचा आणि उत्साहाचा, प्रकाशाचा सण. जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. या दिवाळीच्या दरम्यान फराळ, गोडाधोडाचे पदार्थ बनवण्या बरोबरच आणखी एक आकर्षण असतं ते म्हणजे फटाक्यांचं. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळीत फटाके फोडायला आवडतात. दिवाळीत फटाके फोडताना डोळ्यांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. या दरम्यान तुम्ही थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी ते तुम्हाला महागात पडू शकतं.
फटाक्यांमधून निघणारा धूर तुमच्या फुफ्फुसासाठी आणि डोळ्यांसाठी हानिकारक असतो आणि त्यातून निघणाऱ्या ठिणग्यांपासून डोळ्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. खबरदारी घेऊनही फटाके पेटवताना चुकून एखादी ठिणगी डोळ्यात पडली तर काही गोष्टी लक्षात ठेवा. फटाक्याची ठिणगी डोळ्यावर पडल्यास काय करावे आणि काय करू नये यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी काही खास टिप्स दिल्या आहेत.
काय करावे आणि काय करू नये हे डॉक्टरांकडून जाणून घ्या
दरवर्षी दिवाळीत फटाके फोडताना जळण्याच्या अनेक घटना घडतात. या संदर्भात आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, फटाके फोडताना डोळ्यांना काही त्रास होत असेल तर घरीच उपचार करणे टाळा. तसेच कोणाच्याही सल्ल्याशिवाय डोळ्यांत ट्यूब किंवा कोोणत्याही औषधाचा थेंब टाकू नका. चुकूनही घरगुती उपाय करू नका. जर फटाके फोडताना चुकून तुमच्या डोळ्यांत फटाक्याची ठिणगी गेली तर सर्वात आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यानंतर लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
'ही' काळजी घ्या
फटाके फोडताना जर तुमच्या डोळ्यांत ठिणगी पडली तर डोळे चोळण्याची चूक करू नका. कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणाही तुमच्या दृष्टीसाठी घातक ठरू शकतो. जर तुम्ही दिवाळीत फटाके उडवत असाल तर त्यानंतर तुमचे आणि मुलांचे हात पूर्णपणे स्वच्छ करायला विसरू नका, कारण फटाके बनवताना अनेक प्रकारची रसायने वापरली जातात. त्याच हातांनी डोळ्यांना स्पर्श केल्यास जळजळ, खाज आणि लालसरपणा होऊ शकतो आणि काळजी न घेतल्यास समस्या वाढू शकते.
फटाके फोडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- जर तुम्ही फटाके फोडत असाल तर यावेळी डोळ्यांना चष्मा लावा, यामुळे फटाक्यांच्या धुरापासून आणि त्यातून निघणाऱ्या ठिणग्यांपासून तुमचे डोळे सुरक्षित राहतील.
- फटाके फोडताना पूर्ण काळजी घ्या.
- हातात फटाके फोडण्याची चूक अजिबात करू नका.
- स्पार्कलर वापरताना विशेष काळजी घ्या.
- मुलांना एकटे फटाके जाळू देऊ नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :