Covid Vaccine Death: कोरोनानं (Corona Virus) अख्ख्या जगात हाहाकार माजवला. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं होतं. जगभरातील शास्त्रज्ञांनी दिवस रात्र एक करून कोरोनावर प्रभावी अशा लसी तयार केल्या. पण कोरोनापासून बचाव करणाऱ्या याच लसींवर (Corona Vaccine) अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेली लस त्यांच्याच जीवावर उठली आहे का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. 


कोविड-19 महामारीनंतर सरकारनं लोकांचे जीव वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू केली आहे. देशातील लोकांना लसीचे 2 अब्जाहून अधिक डोस देण्यात आले. परंतु, गेल्या एक ते दीड वर्षांत देशात हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत यामागे ही लसच कारणीभूत आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


दरम्यान, ICMR नं नुकताच संशोधन केलं आहे. यामध्ये कोविड लस आणि आकस्मिक मृत्यू यांचा काही संबंध आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात आलं आहे. भारतात कोविड-19 लसीमुळे तरुणांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढलेला नाही, असं ICMR नं केलेल्या संशोधनातून समोर आलं आहे. तसेच, संशोधनाच्या निष्कर्षात म्हटलं आहे की, कोविड-19 पूर्वी हॉस्पिटलायझेशन, कुटुंबातील आकस्मिक मृत्यूची जुनी प्रकरणं आणि जीवनशैलीतील बदल यामुळे अचानक मृत्यूंची संख्या वाढली असून शकते. 






ICMR च्या संशोधनात आणखी काय? 


ICMR नं संशोधनात म्हटलं आहे की, लसी आणि आकस्मिक मृत्यू यांचा काहीही संबंध नाही. संशोधनातून समोर आलंय की, जर एखाद्यानं लसीचा किमान एक डोस घेतला असेल तर कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा धोका कमी होतो. 


संशोधनात असं म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसमुळे रुग्णालयात दाखल झाल्याचा इतिहास, अचानक मृत्यूचा कौटुंबिक इतिहास, मृत्यूच्या 48 तास आधी दारू पिणं, ड्रग्ज घेणं किंवा मृत्यूच्या 48 तास आधी जोरदार व्यायाम करणं ही काही कारणं आकस्मिक मृत्यूची असू शकतात. या कारणांमुळेच व्यक्तीच्या अचानक मृत्यूचा धोका वाढतो.


ICMR नं केलेलं संशोधन 1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आलेलं आहे. त्यात देशभरातील 47 रुग्णालयांचा समावेश होता. 18 ते 45 वर्ष वयोगटातील लोक, जे वरवर निरोगी दिसत होते, त्यांचा संशोधनात समावेश करण्यात आला होता. त्यांच्यापैकी कोणालाही कोणताही जुना किंवा अनुवंशिक आजार नव्हता. तसेच, संशोधनातून आणखी एक महत्त्वाची बाबही समोर आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांमध्ये अचानक मृत्यूचा धोका खूपच कमी होता.