Cancer: माजी क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot singH Siddhu) यांनी नुकतंच कर्करोगावर मात केलेल्या पत्नी नवज्योत सिद्धूच्या उपचाराबाबत मोठा दावा केला होता. अमृतसर येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी दावा केला होता की, त्यांच्या पत्नीने आहारात काही गोष्टींचा समावेश करून स्टेज 4 कॅन्सरवर मात केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले असले तरी डॉक्टरांनी त्यांचे दावे फेटाळून लावले. सिद्धूने सांगितले होते की, त्यांच्या पत्नीने आपल्या आहारात कडुलिंबाची पाने, लिंबू पाणी, सफरचंद सायडर व्हिनेगर, कच्ची हळद, तुळस, भोपळा आणि डाळिंब इत्यादींचा समावेश करून कर्करोगावर मात केली आहे.
केमोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीद्वारे कर्करोग होतो बरा
सोशल मीडिया आणि डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोमवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये, त्यांच्या पत्नीचा संपूर्ण आहार चार्ट शेअर करताना, त्यांनी सांगितले की, माझ्या पत्नीच्या कर्करोगाशी लढाईमध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, हार्मोनल आणि टार्गेटेड थेरपी, सकारात्मकता आणि कर्करोगाशी लढण्याचा दृढनिश्चय यांचा समावेश आहे.
डाएट आणि योग्य जीवनशैलीचे पालन
आपल्या दोन पानांच्या पोस्टमध्ये, माजी क्रिकेटपटूने सांगितले की, त्याच्या पत्नीचे उपचार कठोर आहार योजनेवर आणि योग्य जीवनशैलीचे पालन करण्यावर आधारित होते. त्यांनी सांगितले की त्यांची पत्नी प्राचीन भारतीय आयुर्वेद, पोशिनोरी ओसुमी यांचे ऑटोफॅजीमधील संशोधन आणि जगभरातील नामवंत डॉक्टरांच्या निरीक्षणांनी प्रेरित आहाराचे पालन करते.
रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये 12 तासांचे अंतर
सिद्धूने त्याच्या पोस्टमध्ये संपूर्ण आहार चार्ट शेअर केला आहे. त्यात म्हटलंय की, तुमच्या पिण्याच्या पाण्याची आदर्श pH पातळी 7 असणे आवश्यक आहे ज्यामुळे तुमची रिकव्हरी लवकर होईल. याशिवाय वेलची, तुळस, पुदिना, आले आणि दालचिनी असलेल्या काढ्याचे सेवन करा. सिद्धू म्हणाले की रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये किमान 12 ते 17 तासांचे अंतर ठेवून सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचे पहिले जेवण सकाळी 10:00 वाजता घ्या.
हेही वाचा>>>
Cancer: अवघ्या 40-50 दिवसांत स्टेज 4 कॅन्सरवर मात? नवज्योत सिंह सिद्धूच्या पत्नीची कमाल, सांगितला संपूर्ण Diet, तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )